#प्रभात_दीपोत्सव_२०२० : चंदेरीदुनिया; वेबसिरीज व ओटीटीमुळे क्रांती

– ‘बागी’


चित्रपटसृष्टीत दर दिवशी काहीतरी नवी टूम येते व त्याची चर्चा रंगू लागते. खरेतर मध्यंतरी काही महिने या क्षेत्राला अवकळा आल्याचेच चित्र आहे. “चंदेरी दुनिये’च्या आकर्षणामुळे मायानगरी मुंबापुरीत लाखो मुले-मुली दाखल होतात. काही जणांचे नशिब पालटते तर काहींच्या नशिबी अपयश येते. मार्चपासून जगभरात करोनाचा धोका वाढू लागला व लॉकडाऊनमध्ये चित्रपटगृहेही बंद झाली. याच काळात चाहत्यांसाठी एक नवी गोष्ट घडली की, ज्यामुळे या दुनियेत क्रांती घडली. ओटीटी आणि वेबसिरीज या दोन गोष्टींनी चाहत्यांना वेड लावले.

अगदी सुरुवातीला वेबसिरीजच्या क्षेत्रात किती यश मिळेल याविषयी शंका व्यक्‍त केली जात होती. मात्र, या प्लॅटफॉर्मला मिळत असलेला प्रतिसाद पाहिला, तर येत्या काळात चित्रपट शौकिन चित्रपटगृहात जातील का, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. हिंदीच्या बरोबरीने मराठी चित्रपटांनाही आता ओटीटी खुणावत असून वेबसिरीजने तर मराठीतही धूमाकूळ घातला आहे.

काही वर्षांपासून मल्टिफ्लेक्‍स चित्रपटगृहे सेवेला हजर झाल्यामुळे “सिल्व्हर ज्युबिली’, “गोल्डन ज्युबिली’ साजरे करणारे चित्रपटांचे युग मावळले. आता नवे शब्द अस्तित्वात आले. ओटीटी आणि वेबसिरीज हिंदीबरोबरच मराठी चित्रपट किंवा वेबसिरीजने प्रेक्षकांना वेड लावले आहे. त्यातच नवनवे विषय, त्यांची मांडणी समोर येत आहे. इतकेच नव्हे तर नवे चेहरेही प्रचंड लोकप्रियता मिळवत आहेत.

काही दशकांपूर्वी शेअर मार्केटमध्ये गडबड करणारा हर्षद मेहता किंवा स्टॅम्पपेपरचा घोटाळा करणारा अब्दुल करीम तेलगी यांचे कारनामे वेबसिरीजच्या रूपाने या प्लॅटफॉर्मवर सादर झाले व त्यांनी लोकप्रियतेचेच नव्हे, तर कमाईचेही विक्रम मोडले. प्रतीक गांधी या व्यक्‍तीने हर्षद मेहताची केलेली भूमिका खुद्द महानायक अमिताभ बच्चन यांनाही भावली, हेच या प्लॅटफॉर्मचे यश म्हणावे लागेल. आता तर मराठी वेबसिरीजनेही विक्रमांचे ईमले रचलेले पाहायला मिळत आहेत.

गेल्या सात महिन्यांत जवळपास 10 मराठी वेबसिरीज या प्लॅटफॉर्मवर सादर झाल्या. तिकिटबारीवर मिळाले नसते, असे यश त्यांना ओटीटीवर मिळाले. ज्या अभिनेत्यांना एखाद्या चित्रपटासाठी मिळाले नसेल इतके प्रचंड मानधन त्यांना मिळताना दिसते. करोना काळात चित्रपटगृहे बंद असताना प्रेक्षकांना घरातून बाहेर पडता येत नव्हते, त्यातूनच या माध्यमाला सुगीचे दिवस आले.

आज या क्षेत्रातील जे बडे स्टार आहेत ते देखील या प्लॅटफॉर्मकडे वळले आहेत. सैफ अली खान, मनोज वाजपेयी, अक्षय कुमार, अर्जुन कपूर, नवाजुद्दीन सिद्दीकी, बॉबी देओल, राजकुमार राव, प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोन, बबलू पंडित, पंकज त्रिपाठी, विद्या बालन, अनिल कपूर या बड्या स्टार्सनीही आता याच स्तरावर लक्ष केंद्रित केले आहे.

मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कलाकारही यात मागे नाहीत. स्वप्निल जोशीची “समांतर’ ही वेबसिरीज तुफान लोकप्रिय झाली. त्या पाठोपाठ जवळपास 10 मराठी वेबसिरीजही आपली लोकप्रियता वाढवून आहेत. समांतर नंतर “हाय टाइम’, “खाले डंडे’, “गोंद्या आला रे’, “शाळा’, “पांडू’, “सेफ जर्नी’, “मुव्हिंग आउट’, “आणि काय हवे’, “वन्स अ इयर’ या वेबसिरीजनी कमाईचे विक्रम केले. स्वप्निल जोशीसह अभिज्ञा भावे, प्रिया बापट, उमेश कामत, भूषण प्रधान, आनंद इंगळे, सुनील बर्वे, दीपक शिर्के, सुहास शिरसाट, महेश मांजरेकर, संस्कृती बालगुडे, आशुतोष गोखले आदी बड्या कलाकारांनीही याच स्तरावर प्रचंड लोकप्रियता मिळवली.

भयकथा किंवा रहस्यकथा लिहिण्यासाठी प्रसिद्ध असलेले सुहास शिरवळकर यांच्याच कादंबरीवर बेतलेली “समांतर’ ही वेबसिरीज इतकी गाजली की त्याची कानडी, तेलगू, तमिळ व हिंदी आवृत्तीही सादर झाली व त्यांनीही मोठी कमाई केली. या वेबसिरीजला तयार करतानाचा खर्च पाहिला किंवा त्याचे आकडे पाहिले की, असे वाटते “बिग बजेट’ म्हणून प्रदर्शित होणारे चित्रपटही मागे पडतील. यात काम करत असलेल्या कलाकारांचे मानधनही काही कोटी रुपयांच्या घरात जात आहे.

मराठी कलाकारही चांगल्या भूमिका निभावताना दिसत आहेत. जवळपास दीड दशकापासून मराठीत अत्यंत सरस विषयांचे लेखन सुरू झाले, त्यावर प्रदर्शित होत असलेल्या चित्रपटांनीही कमाईचे विक्रम केले. “सैराट’ हे त्याचे ताजे उदाहरण आहे. मात्र, आता हीच कमाईची झेप वेबसिरीजनेही घेतली आहे. संकट म्हणा किंवा संधी पण करोनाच्या धोक्‍यामुळे या क्षेत्राला बरकत आली, प्रतिष्ठा मिळाली, आर्थिक स्थैर्यही आले आणि आता येत्या काळात वर्ल्ड टीव्ही प्रीमिअर नावाने प्रेक्षकांना वेडे ठरवणे बंद होईल व नवे चित्रपट किंवा वेबसिरीज याच प्लॅटफॉर्मवर सर्वप्रथम प्रदर्शित होताना दिसतील. अर्थात, त्यामुळे चित्रपटगृहांचे आकर्षण किंवा महत्त्व कमी होणार नाही; पण हा नवा पर्याय लवकरच स्वीकारला जाईल, असा विश्‍वास वाटतो.

टीआरपी, डिसलाइक्‍स व स्टार
काही वर्षांपासून टीआरपी या शब्दाने सिनेजगताला वेडे केले. टेलिव्हिजन रेशो पॉइंट (टीआरपी) जास्त असेल तरच त्या मालिका किंवा चित्रपट यशस्वी असल्याचे मानले जाते. तसेच सुशांतसिंह राजपूत प्रकरणानंतर ज्यांच्या नावांची चर्चा झाली, त्या स्टार्सच्या चित्रपटांना ‘डिसलाइक’ केले गेले. ज्यांच्या भोवती संशयाचा फेरा सुरू झाला, त्यांचे चित्रपट, तसेच वेबसिरीजवर प्रेक्षकांनी डिसलाइक्‍सचा भडीमार केला. यातून अद्याप सिनेजगत सावरलेले नाही. या प्रकरणात ज्यांची नावे आली किंवा ज्यांच्या चित्रपटांबाबत प्रेक्षकांनी तोंड वाकडे करणेच पसंत केले. त्यांच्या या “डिसलाइक्‍स’ला खुद्द निर्माते-दिग्दर्शकही घाबरलेले आहेत, इतकी मोठी ताकद सोशल मीडियाने दाखवून दिली आहे. 

स्टार म्हणजे जे चित्रपट पाहण्यालायक आहेत की नाही, ते सांगणे. एक स्टार किंवा दोन स्टार दिले गेले तर कोणी त्याकडे फिरकतही नाही. आता ओटीटीवर देखील हे चित्र दिसून येत आहे. त्या उलट याच स्तरावर सध्या मलिकांच्या भागांसारखा गाजत असलेला “मिर्झापूर’ हा चित्रपट म्हणा किंवा वेबसिरीज म्हणा प्रचंड धुमाकूळ घालत आहे.

मानधनाची झेप
ओटीटीवर प्रदर्शित होत असलेल्या सामान्य वेबसिरीजमध्ये प्रमुख भूमिका निभावत असलेल्या कलाकाराला एका भागासाठी पूर्वी 10 हजार रुपये मानधन मिळत होते. त्याचबरोबर सहकलाकारांना 1 ते 4 हजार रुपये मानधन दिले जात होते. मात्र, “समांतर’, “मिर्झापूर’सारख्या सिरीजनी याबाबतही विक्रम साकार केले. अशा प्रचंड गाजत असलेल्या सिरीजमधील प्रमुख कलाकारांना काही कोटी रुपयांचेही मानधन देण्यात येत आहे. त्यामुळेच हे बडे स्टार सध्या चित्रपटांच्या चित्रिकरणाला वेळ देण्यापेक्षा आपल्या तारखा या सिरीजला देताना दिसतात. छोट्या पडद्यावर काम करण्यासाठी पूर्वी हेच बडे स्टार नकार देत होते. आज परिस्थिती इतकी बदलली आहे की, हेच स्टार या सिरीजमध्ये काम करण्यासाठी वशिलेबाजीही करताना दिसतात.

खरे सांगायचे तर या वेबसिरीजमध्ये काम करणारे कलाकार लाखो रुपयांचे मानधन एका भागासाठी घेत आहेत. त्यात राम कुमार, दिव्यांका त्रिपाठी, हिना खान, करण पटेल, अंकिता लोखंडे, रोनित रॉय, साक्षी तन्वर, दृष्टी धामी, मोहित रैना, शिवाजी साटम आदी कलाकार तर एकेका भागासाठी तब्बल 1 ते 2 लाख रुपये मानधन घेतात.

बजेटची धूम
भारताबाबत बोलायचे झाले, तर वेबसिरीजच्या एका भागाचे बजेट साधारणपणे 3 ते 4 कोटी रुपये असते. त्यात “नेटफ्लिक्‍स’ किंवा “इरॉस’ या नामांकित प्रॉडक्‍शन हाऊसच्या वेबसिरीजला जवळपास 5 कोटी किंवा त्यातील कलाकारांची प्रतिष्ठा पाहता, त्यात वाढही होते. अशा वेबसिरीज तयार केल्या गेल्या की, त्यातून निर्मात्यांना प्रचंड कमाई होताना दिसत आहे. ओटीटीवर ही सिरीज प्रदर्शित झाल्यावर त्याच्या ठराविक मिनिटांच्या प्रक्षेपणादरम्यान सातत्याने जाहिराती दाखवल्या जातात. याच जाहिरातींचा दर प्रत्येक सेकंदाला लाखो रुपये असतो. त्यामुळे ही सिरीज निर्माण करण्यासाठी जरी करोडो रुपये खर्च झाला असला तरीही त्यातून त्याच्या जवळपास 10 टक्‍के जास्त कमाई होते. परदेशात हाच आकडा लक्षावधी मिलियन डॉलर्स असतो; पण आपल्या देशातही त्याची झेप व कक्षा आता वाढत आहे.

समीक्षकांपेक्षा प्रेक्षकच महत्त्वाचे
भारतात काय किंवा परदेशात काय, कोणताही चित्रपट प्रदर्शित झाला की वर्तमानपत्रात त्याबद्दल चांगले लिहिले गेले आहे का, किंवा त्यावर टीका केली गेली आहे का, हे पाहूनच प्रेक्षक चित्रपट पाहावा की नाही, हे ठरवत होते. चित्रपट, दिग्दर्शक, कलाकार हे सर्व या परीक्षणाकडे डोळे लावून बसत होते. तसेच काही निर्माते जुगाड करून आपल्या निर्मितीबद्दल चांगलेच छापून यावे यासाठी विविध मार्गही अवलंबत होते. आज ही सर्व लबाडी मागे पडली असून वेबसिरीजच्या माध्यमातून थेट प्रेक्षकच यावर व्यक्‍त होतात व त्याला चांगले किंवा वाईट संबोधतात. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व प्रेक्षक यांच्यातील सो-कॉल्ड समीक्षकांचा दुवा या प्लॅटफॉर्ममुळे बाजूला पडताना दिसत असून लवकरच हा दुवा नामशेषही होण्याच्या मार्गावर आहे.

प्लॅटफॉर्मही सज्ज
ओटीटी हा स्वतंत्र प्लॅटफॉर्म असला तरीही मोठ्या निर्मिती संस्थाही आता याच क्षेत्रात उतरलेल्या दिसत आहेत. त्यात “इरॉस’, “नेटफ्लिक्‍स’ व “ऍमेझॉन प्राइम’ यांसारख्या आघाडीच्या संस्थाही प्रचंड लोकप्रिय ठरत आहेत.

ओटीटीचे प्रकार आणि फायदे
हा प्लॅटफॉर्म सध्या तीन प्रकारात उपलब्ध आहे. 1. ट्रान्झक्‍शनल व्हिडिओ ऑन डिमांड (टीव्हीओडी), 2. सबस्क्रिब्शन व्हिडिओ ऑन डिमांड (एसव्हीओडी) 3. ऍडव्हर्टाइझिंग व्हिडिओ ऑन डिमांड (एव्हीओडी)
असे तीन प्रकार सध्या अस्तित्वात आहेत. त्यात येत्या काळात वाढही होणार आहे, हीच नव्या युगाची नांदी ठरेल. या तीनही प्रकारात प्रेक्षकांचा थेट सहभाग असतो व त्यांच्या मताला सर्वात जास्त महत्त्वही असते. हा प्लॅटफॉर्म “शेतकरी ते ग्राहक’ याच संकल्पनेतून साकार झाला आहे. “निर्मिती संस्था ते प्रेक्षक!’ बाकी काही नाही, असेच याला संबोधले जाते. या स्तरावरील सेवा मिळवण्यासाठी प्रेक्षकांना कोणत्याही केबल टीव्ही किंवा डीश टीव्हीची गरज नाही.

इंटरनेटच्या माध्यमातून स्मार्ट टीव्ही किंवा मोबाइलवरही त्याचा आनंद लुटता येतो, हाच या सेवेचा खरा मोठा फायदा आहे. चित्रपटगृहात जाऊन 200 किंवा 300 रुपयांची तिकिटे खरेदी करून आनंद लुटण्यापेक्षा हा पर्याय सर्वसामान्यच नव्हे, तर सर्वच स्तरांतील प्रेक्षक स्वीकारताना दिसत आहेत.

चित्रपटांपेक्षाही जास्त लोकप्रिय
पूर्वी एखादा चित्रपट प्रदर्शित झाला की, तो “सिल्व्हर ज्युबिली’ किंवा “गोल्डन ज्युबिली’ झाल्यावरच हीट ठरल्याचे मानले जात होते. ओटीटीने हे सर्व गणितच बदलून टाकले. आता चित्रपटगृहात जाऊन तिथे गर्दी करत तिकीट काढायचे व मग त्याचा आनंद लुटायचा, हा सर्व प्रकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. चित्रपटांचे प्रिमिअर आवर्जून पाहिले जात होते, कारण तिथे प्रत्यक्ष कलाकारांनाही पाहता यायचे; किंवा त्यांची भेट घेता यायची. आता ही थेट-भेट होत नसली तरीही त्याकडे वळत असलेल्या प्रेक्षकांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे.

येत्या काही वर्षांत चित्रपट पाहावा की, वेबसिरीज असा एक गहन प्रश्‍न निर्माण झाला असेल. वेबसिरीजची लोकप्रियता प्रचंड वाढत असल्याने चित्रपटांपेक्षाही त्यांची निर्मिती जास्त होत आहे.

रिपिटेशनमुळे प्रेक्षक दुरावले
भाषिक चित्रपट किंवा मालिकांचे विषय जवळपास सारखेच होत असल्याचे गेल्या काही दिवसांत दिसत असल्याने तसेच विषयांतही तोचतोचपणा येत असल्याने मराठी मालिका किंवा चित्रपटच नव्हे तर भाषिक कार्यक्रमांनाही प्रेक्षक कंटाळले होते. त्यातूनच या वेबसिरीजची लोकप्रियता कमालीची वाढली. मराठी वेबसिरीजनी चांगलाच जम बसवला आहे.

अंडरवर्ल्ड, गुन्हेगारी विषयांच्या वेबसिरीज तर प्रचंड गाजताना दिसत आहेत. त्यामुळे अनेक वर्षे सुरू असलेल्या मालिकांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मराठीतील विपुल व संपन्न साहित्यसंपदा, विविध दिग्दर्शक अशा सिरीजच्या माध्यमांतून प्रेक्षकांसाठी नवनवीन बाबी तयार करत आहेत व त्याला चांगला प्रतिसादही मिळताना दिसत आहे.

ओटीटीवर प्रसिद्ध निर्मात्यांच्या चित्रपटांपेक्षा “एक थी बेगम’, “जमतारा’, “समांतर’, “स्टेट ऑफ सीएज’ आणि “रक्‍तांचल’ या सिरीजने लोकप्रियतेचे सर्व विक्रम पार केले आहेत. आता असेही सांगितले जात आहे की, येत्या काळात चित्रपटगृहांतील गर्दी दिसली नाही तरी आश्‍चर्य वाटणार नाही. हा प्लॅटफॉर्म दिवसेंदिवस आणखी प्रगत होणार आहे व याकडे वळणारा प्रेक्षकच कालाकारांसाठी केंद्रबिंदू ठरेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.