चंदनचोरांना पायबंद घालण्याचे आव्हान

पारगाव शिंगवे – राज्यात चंदनाची झाडे तोडण्यावर बंदी असताना चोरीचे प्रमाण वाढले आहे. पुणे जिल्ह्यात चंदन चोरांचा सुळसुळाट झाला. या चंदनाच्या चोऱ्यांना पायबंद घालण्यासाठी शेतकरी व निसर्गप्रेमी नागरिक आणि शासनाने एकत्र येणे
गरजेचे आहे.

पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावरील चंदनाच्या झाडांच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. चंदनाची झाडाची तोड होत असून, नदीकाठी असलेल्या शेतकऱ्याच्या जमिनीतील झाडाची तोड करून त्यातील चंदन चोरून नेणे या घटना वारंवार घडत आहेत. वनक्षेत्रातील चंदनाची अर्धवट तोडलेली झाडे खूप ठिकाणी आढळत आहेत.

चंदनचोर दिवसभर वनविभागाच्या वनक्षेत्रात व शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या बांधावरील चंदनाच्या झाडांची पाहणी करतात आणि धारदार हत्याराने चंदनाच्या झाडाला छेद पाडून त्या झाडाच्या आतील भागात चंदनाचा सुगंध (वास) येतो का, हे पहातात. रात्रीच्या वेळी करवतीने चंदनाच्या झाडाच्या आतील भागात असलेला चंदनाचा गाभा काढून चोरून नेला जातो. जिल्ह्यातील स्थानिक चंदन चोर हे चोरून आणलेला चंदनाचा गाभा (लाकूड) 3 ते 4 हजार रुपये किलो दराने विकतात. चंदनाचे एक झाड परिपूर्ण होण्यासाठी 10 ते 15 वर्षांचा कालावधी लागतो. चंदनाच्या झाडाचा गुणधर्म थंड असल्याने या झाडांवर सर्पांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो.

चंदनाच्या झाडे तोडण्यावर बंदी असल्याने शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. चंदनाच्या झाडांची पूर्ण वाढ न होताच चंदनचोर या झाडाची तोड करतात ग्रामीण भागात चंदन चोरांचा सुळसुळाट झाला आहे. चंदनाची झाडे वाचवण्यासाठी शेतकरी व निसर्ग प्रेमी नागरिक व शासनाने एकत्र येणे गरजेचे आहे. तसेच चंदनाच्या झाडांच्या लागवडीला प्रोत्साहन देणे आणि शासनाने चंदनाची झाडे खरेदी करणे गरजेचे आहे.

चंदनाचे तेल 40 हजार रुपये लिटर
चंदनाच्या झाडाचे महत्त्व आणि मोल हे सोन्याच्या किंमतीसारखे असल्याने बाजारपेठेत चंदनाच्या तेलाला मोठी मागणी आहे. हिंदू धर्मात चंदनाचा वापर देवाच्या पुजा, होम यामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच बाजारपेठेत चंदनाच्या एक लिटर तेलाची किंमत 35ते40 हजार इतकी आहे या तेलाचा सुगंधी अगरबत्ती, साबण, सौंदर्य प्रसादणे, आयुर्वेदिक औषधे यामध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

चंदनाची झाडे तोडण्यावर बंदी असल्याने झाडांची चोरी होत आहे. चंदनाची चोरी करणाऱ्या चोरट्यांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच शासनाने चंदनाच्या झाडांची खरेदी करणे आवश्‍यक आहे. यामुळे चंदनाची चोरीला आळा बसेल व चंदनाच्या झाडांची काळजी शेतकरी घेतील.
-राजेंद्र ढोबळे, शेतकरी


शेतकरी व नागरिकांनी चंदनाच्या झाडाच्या चोरी संदर्भात पोलीस ठाण्यात कळविणे गरजेचे असून चंदन चोरट्यांसंबंधी व चंदन दलालांची माहिती पोलिसांना दिल्यास चंदन चोरांचा बंदोबस्त करता येईल.
-रवींद्र मांजरे, सहायक पोलीस निरीक्षक गुन्हे अन्वेषण


वनविभाग कर्मचारी दररोज वनक्षेत्रात जाऊन पाहणी करीत असतात नागरिकांनी चंदन चोरट्यांविषयी माहिती दिल्यास वनविभागाच्या वतीने कारवाई करण्यात येईल.

-पी. डी. पालवे, वनक्षेत्रपाल

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.