पुणे – शहर परिसरात गेल्या पाच दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून, शहराच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याची नोंद झाली आहे. शहरात बुधवारी (दि.18) दिवसभर ढगाळ वातावरण आणि उकाडा जाणवत होता, तर पुढील दोन दिवस शहर परिसरात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच आगमनाची चाहूल देणारी थंडी दि.12 नोव्हेंबरपासून गायब झाली आहे. यानंतर तापमानात सातत्याने वाढ होत असून, गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण जाणवत आहे. या तापमानवाढीमुळे ऐन दिवाळीत नागरिकांना थंडीऐवजी उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
हवामान विभागाच्या नोंदीनुसार, अरबी समुद्रात दक्षिण-पश्चिम पूर्व भागामध्ये कमी दाबाचा पटटा तयार झाला आहे. पुढील 48 तासांत याचे रुपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्टयात होणार असून, त्यानंतर म्हणजेच 21 नोव्हेंबरच्या सुमारास हा पट्टा ओमानच्या दिशेने सरकेल. या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. याबरोबरच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या द्रोणीय स्थितीच्या प्रभावामुळे राज्यातील तापमनात वाढ झाली असून, थंडीचा कडाका कमी झाला आहे.
तसेच पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. पुढील दोन दिवस शहर परिसरात ढगाळ वातावरण कायम राहणार असून, मेघगर्जनेसह पावसाची शक्यताही विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शहरात कमाल तापमान 31. 5, तर किमान तापमान 18.5 इतके नोंदविण्यात आले. शहराच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत 4.2 अंश सेल्सिअस इतकी वाढ झाल्याची नोंद विभागाने घेतली आहे.