पुणे – शहरात जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे कमाल तापमान ३३ अंशाच्या पुढे गेले आहे. त्यामुळे एन पावसाळ्यात पुणेकरांना उन्हाचा चटके सोशावे लागत आहे. शुक्रवारी (दि. २०) सकाळपासून उन्हाचा चटका वाढलला असून, वडगावशेरी येथे सर्वाधिक ३४.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
दरम्यान, पुढील दोन दिवसात शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली होती. मात्र, पावसाने हुलकावणी दिली आणि मागील तीन आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली. त्यामुळे 23 अंशापर्यंत खाली गेलेले कमाल तापमान हळूहळू वाढले.
मागील आठवड्याभरात कमाल तापमान 30 अंशाच्या पुढे गेल्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाडाही वाढलेला आहे. आज बहुतांश भागातील कमाल तापमान ३३ ते ३४ अंशापर्यंत गेले होते. शिवाजीनगर परिसरात ३२.२, हडपसर येथे ३३.४, मगरपट्टा ३३.६, वडगावशेरी ३४.१ तर ढमढेरे येथे ३५.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
वाढते तापमान आणि उकाड तसेच हवामानातील बदलामुळे दोन पुढील दोन दिवस हवामान कोरडे तर शहरात हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. दि. २२ सप्टेंबरपासून शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर वाढेल. त्यामुळे पुढील आठवड्यात पुण्यासाठी हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.