पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मध्य महाराष्ट्र आणि कोकण, तसेच गोव्यातील काही ठिकाणी नैऋत्य मोसमी पाऊस जोरदार पडत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही मेघगर्जनेसह पाऊस पडत असून, परतीच्या पावसाला परतण्यासाठी अनुकूल वातावरण आहे.
दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस बहुतांश जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली असून, यलो अलर्ट दिला आहे.
लक्षद्वीपलगतच्या अग्नेय व पूर्ण मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र आता तीव्र झाले आहे. ते कर्नाटक- गोवा किनारपट्टीलगतच्या पूर्व अरबी समुद्रावर स्थिर आहे.
राज्यात कोकण- गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवस विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडेल. विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील एक ते दोन दिवस पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
त्यामुळे पुढील २४ तासांत पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडेल, तर कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
गेल्या २४ तासांत कोकण व गोव्यातील उरण येथे सर्वाधिक ६०, रोहा येथे ५०, तर वसई परिसरात ४० मिमी पावसाची नोंद झाली.
मध्य महाराष्ट्रात पेठ परिसरात ५० आणि राधानगरी परिसरात ४० मिमी पाऊस झाला. मराठवाड्यात गंगापूरला २० आणि विदर्भातील चिखलदरा येथे १० मिमी पाऊस झाला. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे.