कुबिल्ट मास्टर्सला विजेतेपद

सुपर ओव्हरमध्ये लवास रॉयल्सचा पराभव

पुणे – रोटरी डिस्ट्रिक 3131 यांच्या तर्फे आयोजित रोटरी मिक्‍स विंटर कप क्रिकेट 2021 स्पर्धेत अंतिम फेरीत सुपरओव्हरमध्ये कु-बिल्ट मास्टर्सने लवास रॉयल्सचा पराभव करत विजेतेपद संपादन केले.
आरएस खांदवे येथील क्रिकेट मैदान व लिजेंड्‌स क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या अंतिम लढतीत कु-बिल्ट मास्टर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजी करताना कु-बिल्ट मास्टर्सने 20 षटकात 4 बाद 173 धावांचे आव्हान उभे केले. यात राहुल कामठे (36), मंगेश हांडे (35), आतिश थोरात (22), सुनिल रोहिला (20) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. लवास रॉयल्सकडून दर्शन वणगे, योगेश वाघ, रतन खरोल, प्रीतम खैया यांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.

या आव्हानाचा पाठलाग करताना लवास रॉयल्सचा डाव 20 षटकात 173 धावावर संपुष्टात आला. यात योगेश वाघ (33), सौरभ रावेलीया (39), समाधान दांडेकर (35), जयंत येवले (15) यांनी छोटी पण महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला 173 धावा उभारून दिल्या. त्यामुळे सामना बरोबरीत राहिला. सामना बरोबरीत सुटल्यामुळे सुपरओव्हर घेण्यात आली.

सुपर ओव्हरमध्ये लवास रॉयल्सने 1 षटकात 1 बाद 10 धावा केल्या. विजयासाठी असलेले 10 धावांचे आव्हान कु-बिल्ट मास्टर्सने 4 चेंडूत एकही गडी न गमावता पूर्ण केले. यामध्ये राहुल कामठेने नाबाद 13, पंकज पाटीलने नाबाद 1 धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी मंगेश हांडे ठरला.

स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण जयमल्हार मराठी मालिकेतील सुपरस्टार अभिनेते देवदत्त नागे, रश्‍मी कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी प्रांतपाल सुबोध जोशी आणि प्रमोद पालीवाल आणि स्पर्धेचे कार्यवाहक महेश घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल : 

अंतिम फेरी :  कु-बिल्ट मास्टर्स : 20 षटकात 4 बाद 173 धावा (राहुल कामठे 36, मंगेश हांडे 35, आतिश थोरात 22, सुनिल रोहिला 20, संतोष जाधव नाबाद 18, देवेंद्र चौधरी नाबाद 17. दर्शन वणगे 1-43, योगेश वाघ 1-26, रतन खरोल 1-18, प्रीतम खैया 1-38) वि.वि. लवास रॉयल्स : 20 षटकात सर्वबाद 173 धावा (योगेश वाघ 33, सौरभ रावेलीया 39, समाधान दांडेकर 35, जयंत येवले 15, मंगेश हांडे 2-37, देवेंद्र चौधरी 1-39, मितेश पतंगे 1-27).

सुपरओव्हर : लवास रॉयल्स : 1 षटकात 1 बाद 10 धावा (योगेश वाघ 4, दर्शन वणगे 6, मंगेश हांडे 1-10) पराभूत वि. कु-बिल्ट मास्टर्स : 0.4 षटकात बिनबाद 14 धावा (राहुल कामठे नाबाद 13, पंकज पाटील नाबाद 1, योगेश वाघ 0-14).

इतर पारितोषिके:

सर्वोत्कृष्ट फलंदाज : जयंत येवले (112 धावा), सर्वोत्कृष्ट गोलंदाज : विक्रम खैया (7विकेट), मालिकावीर : भूषण देशपांडे (91 धावा व 5 विकेट).

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.