Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरू होण्याआधीच नवीन वादाला तोंड फुटले आहे. कथितरित्या भारतीय क्रिकेट संघाने जर्सीवर पाकिस्तानचे नाव छापण्यास नकार दिला आहे. यावर आता आयसीसीची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. सर्व संघांनी नियमांचे पालन करणे अनिवार्य असल्याचे आयसीसीने म्हटले आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचा मुख्य आयोजक पाकिस्तान आहे. आयसीसी स्पर्धेदरम्यान यजमान देशाचे नाव खेळाडूंच्या जर्सीवर लिहिलेले असते. मात्र, भारताने कथितरित्या संघाच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव छापण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.
भारताने संघाच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव छापण्यास स्पष्टपणे नकार दिल्यानंतर आता यावर आयसीसीने प्रतिक्रिया दिली आहे. रिपोर्टनुसार, आयसीसीचे एक अधिकारी म्हणाले की, ‘स्पर्धेचा लोगो जर्सीवर लावणे ही प्रत्येक संघाची जबाबदारी आहे. सर्व संघांना हा नियम पाळणे बंधनकारक आहे. खेळाडूंच्या किटवर यजमान देश असलेल्या पाकिस्तानच्या नावासह चॅम्पियन्स ट्रॉफीचा लोगो आढळला नाही, तर भारतीय संघावर कारवाई होऊ शकते.’
यापूर्वी आशिया कप 2023 स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानचे नाव नसलेली जर्सी घातली होती. मात्र, हा नियम आयसीसीच्या स्पर्धांना लागू होतो. त्यामुळे आता चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेदरम्यान भारताच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव असणार की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
यापूर्वी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने याबाबत बोलताना सांगितले की, भारताला यजमान देश असलेल्या पाकिस्तानचे नाव त्यांच्या जर्सीवर नको आहे. ही एक परंपरा असून, प्रत्येक संघाकडून आयसीसी स्पर्धेदरम्यान याचे पालन केले जाते.
‘बीसीसीआय क्रिकेटमध्ये राजकारण करत आहे. भारताने पाकिस्तानचा दौरा करण्यासही नकार दिला होता. कर्णधारांच्या बैठकीसाठी देखील रोहित शर्माला पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला. आता जर्सीवर देखील नाव छापण्यास नकार दिला आहे. आम्हाला विश्वास आहे की आयसीसी असे होऊ देणार नाही.’, असेही पीबीसी अधिकारी म्हणाला होता.