Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा पुढील महिन्यात सुरु होणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे. परंतु, भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्याने ही स्पर्धा हायब्रिड मॉडेल अंतर्गत होणार आहे. पाकिस्तानसह स्पर्धेतील काही सामने दुबईमध्ये होणार आहेत. मात्र, स्पर्धेच्याआधीच आणखी एका नवीन वादाला तोंड फुटले आहे.
या स्पर्धेचा मुख्य आयोजक असलेल्या पाकिस्तानचे नाव भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवर नसेल. त्यामुळे स्पर्धेआधीच भारतीय संघाने पाकिस्तानला धक्का दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. आयसीसी स्पर्धेदरम्यान यजमान देशाचे नाव खेळाडूंच्या जर्सीवर लिहिलेले असते. मात्र, भारताने कथितरित्या संघाच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव छापण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.
रिपोर्टनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने याबाबत बोलताना सांगितले की, भारताला यजमान देश असलेल्या पाकिस्तानचे नाव त्यांच्या जर्सीवर नको आहे. ही एक परंपरा असून, प्रत्येक संघाकडून आयसीसी स्पर्धेदरम्यान याचे पालन केले जाते.
पीसीबी अधिकारी म्हणाला की, ‘बीसीसीआय क्रिकेटमध्ये राजकारण करत आहे. भारताने पाकिस्तानचा दौरा करण्यासही नकार दिला होता. कर्णधारांच्या बैठकीसाठी देखील रोहित शर्माला पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला. आता जर्सीवर देखील नाव छापण्यास नकार दिला आहे. आम्हाला विश्वास आहे की आयसीसी असे होऊ देणार नाही.’
यापूर्वी बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला होता. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीकडून हायब्रिड मॉडेल स्विकारण्यात आले. या मॉडेल अंतर्गत भारताचे सामने दुबईमध्ये होणार आहेत.
दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना 9 मार्च रोजी पार पडेल. 19 फेब्रुवारीला चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघ 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. त्यानंतर 23 फेब्रुवारीला दुबईच्या मैदानावर भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना पार पडेल. त्यानंतर भारतीय संघ 2 मार्चला न्यूझीलंडशी भिडणार आहे.