टॉटनहॅमचा आयएक्‍सवर 3-2 ने विजय

टॉटनहॅमने अंतिम फेरीतील स्थान केले निश्‍चित

ऍमस्टरडॅम – टॉटनहॅमने तीन गोलची पिछाडी भरून काढत आयएक्‍सचा पराभव करत आगेकूच नोंदवली. यावेळी दोन्ही संघांमदरम्यान झालेल्या पहिल्या सामन्यात आयएक्‍सने त्यांचा 1-0 असा पराभव केला होता. मात्र, उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात 3-2 असा विजय मिळवत टॉटनहॅमने अंतिम फेरीतील स्थान निश्‍चित केले. यावेळी त्यांच्या लुकास मौरा याने झळकावलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर टॉटनहॅमने 3-3 अशा एकूण गोलफरकाच्या आधारावर (प्रतिस्पर्धीसंघाच्या घरच्या मैदानावर केलेले अधिक गोल) आयएक्‍सला धूळ चारली.

उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात आयएक्‍सने टॉटनहॅमला 1-0 असे पराभूत केले होते. तर, दुसऱ्या सामन्यात आयएक्‍सने पहिल्या सत्रातच दोन गोल करत आपली एकूण आघाडी 3-0 अशी वाढवली होती. यावेळी त्यांच्या मॅथिस डे लाइट याने पाचव्या मिनिटालाच हेडरद्वारे गोल करत आयएक्‍सचे खाते उघडले होते. त्यानंतर हकिम झायेच याने 35व्या मिनिटाला आयएक्‍सतर्फे दुसरा गोल करत ही आघाडी 2-0 अशी वाढवली.

दुसऱ्या सत्रात 55व्या मिनिटाला लुकासने पहिला गोल झळकावल्यानंतर चार मिनिटांनी त्याने दुसरा गोल लगावत टॉटनहॅमला या सामन्यात पुनरागमन करून दिले. सामना संपायला अवघ्या काही सेकंदांचा अवधी शिल्लक असताना लुकासने डेले अलीने पास दिलेल्या चेंडूवर नियंत्रण मिळवले आणि आयएक्‍सचा गोलरक्षक आंद्रे ओनाना याला चकवून विजयी गोल लगावत आपली हॅट्ट्रिक साजरी केली. चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीत हॅट्ट्रिक लगावणारा लुकास मौरा हा पाचवा फुटबॉलपटू ठरला. अंतिम क्षणी गोल केल्यानंतर टॉटनहॅमच्या खेळाडूंनी तसेच चाहत्यांनी विजयोत्सव साजरा केला. आता 1 जून रोजी माद्रिद येथे रंगणाऱ्या चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत टॉटनहॅमला लिव्हरपूलशी लढत द्यावी लागेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.