चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा
पॅरिस – युएफा चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत भरात असलेल्या पॅरिस सेंट जर्मन संघाचा (पीएसजी) पराभव करत बायर्न म्युनिकने विजेतेपद पटकावले. या सामन्यानंतर दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. पोलिसांनी अनेकांना अटक केली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरी गाठलेल्या पीएसजी संघावर बायर्नने 1-0 अशी मात करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. हे त्यांचे या स्पर्धेचे सहावे विजेतेपद ठरले. यापूर्वी बायर्न संघाने 1974, 1975, 1976 असे सलग तीन वर्षे विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर 2001 व 2013 साली त्यांनी विजेतेपद मिळवले होते. 7 वर्षांनी पुन्हा एकदा त्यांनी विजेतेपदावर नाव कोरले. करोनाचा धोका असल्याने ही स्पर्धा प्रथमच रिकाम्या मैदानावर खेळवली गेली.
पीएसजी संघात रॉबर्ट लेवानोव्हस्की, मॅन्युअल न्यूअर, नेमार आणि कायलीन एम्पाबे असे जागतिक अव्वल खेळाडू असूनही त्यांना एकही गोल करता आला नाही. पहिला हाफ गोलशून्य बरोबरीत सुटला होता. मात्र, दुसरा हाफ सुरू झाल्यावर बायर्नने आक्रमक खेळ केला. त्यात किंग्जले कोमान याने 59 व्या मिनिटाला गोल केला व बायर्नला आघाडी मिळवून दिली. हाच गोल संपूर्ण सामन्यातील एकमेव गोल ठरला व बायर्नचे विजेतेपद साकार झाले.