नवी दिल्ली – अॅटलांटा संघाने रविवारी सॅस्सूउलो संघावर 3-1 अशी मात करत पहिल्यांदाच चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत खेळण्याची ऐतिहासीक कामगिरी केली आहे. सेरी-ए फुटबॉल स्पर्धेत ऍटलांटाने तिसरे स्थान पटकावले आहे. एसी मिलान संघाला स्पालविरुद्ध विजय मिळवूनही पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागल्याने त्यांचे चॅम्पियन्स लीगमध्ये खेळण्याचे स्वप्न अधुरे राहिले. युव्हेंट्स, नापोली, ऍटलांटा आणि इंटर मिलान हे इटलीच्या सेरी-ए फुटबॉल स्पर्धेतील पहिले चार संघ चॅम्पियन्स लीगसाठी पात्र ठरले आहेत.
यावेळी झालेल्या सामन्यत डॉमिनिको बेरार्डी याने 19व्या मिनिटाला सॅस्सूउलो संघाचे खाते उघडल्यानंतर दुवान झापाटाच्या गोलमुळे ऍटलांटाने बरोबरी साधली. पहिल्या सत्राच्या अखेरीस बेरार्डीला पंचांनी लाल कार्ड दाखविल्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले. त्याचाच फायदा घेत ऍटलांटाने दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला दोन गोल करत सामन्यात आघाडी घेतली.
अलेजांड्रो डारियो गोमेझ याने 53व्या तर मारियो पॅसालिकने 65व्या मिनिटाला गोल करत ऍटलांटाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सॅस्सूउलो संघाला 83व्या मिनिटाला आणखी एक धक्का बसला. त्यांच्या फ्रान्सेस्को मॅग्नानेली यालाही पंचांनी लाल कार्ड दाखविले. त्यामुळे सॅस्सूउलोच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या.