पॅरिस – चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य रेयाल माद्रिद संघाचे यंदाच्या स्पर्धेतील आव्हान धोक्यात आले आहे. या स्पर्धेचे विक्रमी 13 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या रेयाल माद्रिदवर यंदाच्या स्पर्धेत साखळीतच बाद व्हावे लागण्याची शक्यता आहे.
रेयाल माद्रिदला शॅख्तर डॉनेस्कने पुन्हा एकदा 2-0 असे पराभूत केले. काही दिवसांपूर्वी झालेल्या या दोन संघातील सामनाही माद्रिदने गमावला होता. या स्पर्धेच्या इतिहासात माद्रिदने 13 वेळा विजेतेपद मिळवताना तब्बल 24 वेळा बाद फेरी गाठली आहे. मात्र, यंदाच्या स्पर्धेत त्यांची कामगिरी दर्जाला साजेशी झालेली नाही. शॅख्तर डॉनेस्क विरुद्धच्या सामन्यात डेन्टिनोने 57 व्या व मनोर सोलोमनने 82 व्या मिनिटाला गोल करत माद्रिदवर वर्चस्व राखले.
सोलोमनने केलेला गोल या स्पर्धेतील आतापर्यंत झालेल्या सामन्यांतील सर्वात प्रेक्षणीय गोल ठरला. माद्रिदचा हा गेल्या चार दिवसांतील दुसरा पराभव आहे. अन्य सामन्यांत लिव्हरपूलने बाद फेरीत प्रवेश केला आहे. लिव्हरपूलने अयाक्सला 1-0 असे पराभूत केले.
लिव्हरपूलकडून कुर्टिस जोन्सने 58 व्या मिनिटाला गोल केला. लिव्हरपूलने ड गटात पाचपैकी चार लढती जिंकून अव्वल स्थान राखताना बाद फेरीही गाठली. बायर्न म्युनिच व ऍटलेटिको माद्रिद यांच्यातील लढत 1-1 अशी बरोबरीत सुटली.