‘येळकोट, येळकोट’चा जागर; एक लाख भाविकांची मांदियाळी
जेजुरी – महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी यात्रेसाठी सोमवारी (दि.2) एक लाख भाविकांनी हजेरी लावली. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून सुरू झालेल्या चंपाषष्ठी (देवदीपावली) उत्सवाची सोमवारी सांगता झाली. खंडोबाला वांग्याचे भरीत, बाजरीचा रोडगा, पुरणपोळी यांचा नैवेद्य देवाला दाखवण्यात आला.
रविवारपासूनच खंडोबा गडावर चंपाषष्ठी यात्रेसाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. सोमवारी पहाटे ग्रामस्थांच्या मानाच्या पूजा झाल्या. भंडार खोबऱ्याची मुक्त उधळण करीत भाविक येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करीत होते. गडामध्ये पेटवलेल्या दिवट्या हातात घेऊन भाविकांनी तळी भंडाऱ्याचे कार्यक्रम केले. राज्यातील ओला दुष्काळ, आर्थिक मंदी याचा परिणाम यात्रेवर जाणवला भाविकांनी भंडारा खोबरे अल्प प्रमाणात खरेदी केले. गडावर पुजारी सेवक कर्मचारी अन्नदान मंडळाच्यावतीने पाच दिवस पंचपक्वांनाच्या भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांना वांग्याचे भरीत भाजी व बाजरीची भाकरी असे भोजन देण्यात आले. खंडोबा देवस्थानचे विश्वस्त राजकुमार लोढा, संदीप जगताप हे नियोजनासाठी गडावर उपस्थित होते.
दर्शनासाठी पुणे जिल्हा, नाशिक, मराठवाडा आदी ठिकाणच्या भाविकांची संख्या मोठी होती. भाविकांनी मोठ्या श्रध्देने खंडोबाला भंडारा खोबरे, वांगी, कांद्याची पात, बेल, पान फुले अर्पण केले. गडाला आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने रात्री खंडोबाचा गड उजळून निघाला. रविवारी रात्री गावातून तेलहंड्याची मिरवणूक काढण्यात आली. चावडी जवळ हंडा ठेवल्यानंतर त्यामध्ये मानकऱ्यांनी गोडेतेल ओतले. वाजत-गाजत हंडा गडावर नेण्यात आला. रात्री नऊ वाजता देवांची आरती झाल्यावर खंडोबाला बाणाने तेलवण करण्यात आले. सनई चौघड्याच्या मंगलमय वातावरणात मानकऱ्यांनी पारंपारिक गाणी म्हणत देवाला पिवळीधमक हळद लावली.
तेल, तेलवणपाडून खंडोबाचा अभिषेक
दावडी – निमगाव खंडोबा (ता.खेड) येथे चंपाषष्ठीनिमित्त कुलदैवताचे दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासुनच गर्दी केली होती. चंपाषष्टीच्या पूर्वसंध्येला शिंदे, काळे, परीट, माळी व ब्राह्मण समाजाच्या रूढी व परंपरेनुसार तेल, तेलवणपाडून मानकरी शिंदे पाटील यांच्या हस्ते खंडोबा देवास अभिषेक करण्यात आला. महापूजेनंतर मानकऱ्यांच्या हस्ते देवास हळद लावली.
श्रीक्षेत्र निमगाव येथे खंडोबा देवाच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहाटेपासुनच भाविकांनी अभिषेक व दर्शनासाठी गर्दी केली होती. हळद लावण्याआधी पूजा व आरती झाल्यावर मानकरी बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या पत्नी यांनी प्रथम देवास हळद लावल्यानंतर इतर महिलांनी हळद लावल्यावर बाशिंग बांधले. देवास पुरण पोळीबरोबरच वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण यांचा नैवेद्य दाखविला. अखंड हरिनाम सप्ताह मंडळ व जयमल्हार यात्रा मंडळाचे वतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते. एक लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
नियोजन सप्ताह मंडळाचे अध्यक्ष निवृत्ती थोरात, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बबनराव शिंदे, उपाध्यक्ष संतोष शिंदे, बाळासाहेब शिंदे पाटील, सचिव बाबासाहेब शिंदे, पुजारी बाळासाहेब भगत, दशरथ वायकर, नानाभाऊ भगत, रघुनाथ भगत, सरपंच बबनराव शिंदे, माजी सरपंच अमर शिंदे, हर्षद भगत, संजय कुलकर्णी व संचालक मंडळाने केले. सायंकाळी नगरप्रदक्षिणा दिंडी काढण्यात आली.