रांची : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झारखंडमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी एक्सवर पोस्ट करत पक्षाच्या (जेएमएम) नेतृत्त्वावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत सर्व पर्याय खुले असल्याचे त्यांनी जाहीर केले. सोरेन भाजपामध्ये जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
चंपई सोरेन यांनी एक मोठी पोस्ट लिहीत झारखंड मुक्ती मोर्चाच्या हायकमांडवर हल्ला चढवला आहे. गेल्या चार दशकांच्या निष्कलंक राजकीय प्रवासात मी पहिल्यांदा आतमधून इतका खचलो आहे. दोन दिवस शांत बसून आत्ममंथन करतो. सर्व घटनाक्रमावर स्वत:ची चूक काय झाली हे शोधत होतो. मला सत्तेचा थोडासाही लोभ कधीच नव्हता. पण, आत्मसन्मानाला झालेली जखमी कशी दाखवणार? त्यासाठी मी माझं शल्य मांडत आहे, असे सोरेन यांनी म्हंटले आहे.
मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम अन्य व्यक्ती रद्द करतो यापेक्षा लोकशाहीत अधिक अपमानास्पद काय आहे? असे सोरेन यांनी पोस्टमध्ये लिहले आहे. अपमानाचा कडू घोट पिऊन मी सांगितले की नियुक्ती पत्राचे वितरण सकाळी आहे. तर विधिमंडळ पक्षाची बैठक दुपारी आहे. त्या परिस्थितीमध्ये मी कसा सहभागी होईल? पण त्यांनी स्पष्ट नकार दिला.
अनेक वर्षांपासून पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक होत नाही. एकतर्फी आदेश दिले जात आहेत. मी कुणाला माझा त्रास सांगणार? या पक्षात माझी गणना वरिष्ठ नेत्यांमध्ये होते. बाकीचे सर्व ज्युनिअर आहेत. माझ्यापेक्षा सिनिअर सुु्प्रिमो तब्येतीमुळे राजकारणात सक्रीय नाहीत. तर माझ्याकडं काय पर्याय होता. ते सक्रीय असते तर कदाचित परिस्थिती वेगळी असती, असेही त्यांनी सांगितले.