खोदाई केलेल्या रस्त्यासाठी चिंबळीकर आक्रमक

पुणे महानगरपालिकेला आश्‍वासनाचा विसर : पालिकेचा डाव हाणून पाडण्याचा ग्रामस्थांचा निर्णय

चिंबळी – भामा-आसखेड धरण ते पुणे शहरापर्यंत टाकण्यात येत असलेली जलवाहिनी चिंबळी (ता. खेड) गावच्या हद्दीतून जात असून येथील पुणे महानगरपालिकेचे भामा-आसखेड जलवाहिनी प्रकल्पाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. तरीही महापालिकेकडून येथील रस्त्याच्या दुरुस्तीचे अथवा दुरुस्ती कामाच्या निधी वर्ग करण्यात येत नसल्याने ग्रामस्थांनी हे काम आठ दिवसांपूर्वी बंद पाडले आहे. मात्र, पोलिसांच्या दबाव आणून हे काम पुन्हा सुरू करण्याचा महापालिकेचा डाव आहे मात्र, हा डाव आम्ही हाणून पाडून असा आक्रमक पवित्रा चिंबळी ग्रामस्थांनी घेतला असल्याने आता प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकाबाजूने काम सुरू ठेऊन दुसऱ्या बाजूने रस्ते दुरुस्ती सुरू करा, अन्यथा पावसामुळे काम करता येत नसेल तर त्या रस्त्याच्या दुरुस्तीचा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करा. जेणेकरून नंतर दुरुस्तीला निधीची कमी पडणार नाही. अन्यथा महानगरपालिकेचा डाव हाणून पाडू, असा इशारा चिंबळी ग्रामस्थांनी पोलीस व प्रकल्पाचे सुपरवायझर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दिला आहे. बैठकीला आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर, प्रकल्पाचे सुपरवायझर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पाइपलाइनच्या कामासाठी चिंबळी गावात रस्त्याची मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात आली आहे. यामुळे रस्त्याचे मूळ अस्तित्वच नष्ट झाले आहे. दरम्यान, 2016मध्ये गावच्या हद्दीत काम सुरू झाले होते. त्यावेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी काम होईल. तसे रस्ते दुरुस्ती केली जाईल, असे सांगितले होते; परंतु गेल्या अडीच वर्षांत या रस्त्यावर निम्मे काम पूर्ण झाले असतानाही दुरुस्ती केली नाही. साधी डागडुजीदेखील केली नाही. काम पूर्ण झाल्यावर रस्ते करू, या आश्‍वासनावरच ग्रामपंचायतीची बोळवण करण्यात आली. रस्ते नादुरुस्त असल्यामुळे ग्रामपंचायतीला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यामुळेच अखेर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसोबत नागरिक रस्त्यावर उतरले. तसेच काम थांबविले. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी काम बंद पाडल्यानंतर तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली.

पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्याची मागणी केली. काम पूर्ण करून नंतर दुरुस्ती निधी वर्ग करू, असे लेखी आश्‍वासन पोलिसांसमोर ग्रामस्थांना दिले मात्र, 2016 मध्ये दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे हेही आश्‍वासन हवेतच विरून जाणार, असे म्हणत ग्रामस्थ काम बंदच्या भूमिकेवर ठाम असल्याने आता काम सुरू होणार की नाही, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

बनकर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार
काम ज्या ठिकाणी बाकी आहे. त्या कामाच्या दोन्ही बाजूस घरे आहेत. पद्मावतीनगरला रहदारीस याशिवाय रस्ता नाही. याअगोदरच मंदिरासमोरील काम पूर्ण व्हावे, याकरिता बाजार समिती संचालक पांडुरंग बनकर यांनी त्यांच्या जागेतून पर्यायी रस्ता दिला होता; परंतु रस्ता दुरुस्तीसाठी पालिका तात्काळ निधी देत नसेल तर मी पण का पालिकेला सहकार्य करू, अशी भूमिका त्यांनी घेतली. येथील भौगोलिक पाहणी केली असता बनकर यांच्याशिवाय पर्यायी रस्ता उपलब्ध होऊ शकत नाही, असे चित्र आहे. सध्याचा रस्ता अरुंद असल्याने काम सुरू ठेवून वाहतूक होऊ शकत नाही. त्यामुळे सर्वच काम रखडले आहे.

गावातील काम सुरू करतानाच 2016 साली पालिकेने कामादरम्यान खराब होणारे रस्ते दुरुस्ती करून दिले जातील, असे सांगितले होते. मात्र, गेल्या तीन वर्षांत या रस्त्यावर पालिकेने कसलीच दुरुस्ती केली नाही. ग्रामस्थांचा रोष विचारात घ्यायलाच हवा. दिलेला शब्द पाळत पालिकेने तात्काळ निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करावा.

-विलास कातोरे, माजी सभापती, बाजार समिती, खेड.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)