परप्रांतीय गुन्हेगार पोलिसांसाठी ठरतायेत आव्हान

गुन्हेगारीचा नवा पॅटर्न : लूटमार करण्यासाठी इतर राज्यातून येतात सराईत


तपासाच्या कक्षा रुंदावल्या : अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पिंपरी – गेल्या काही दिवसांमध्ये शहराने लूटमार, दरोडे असे मोठे गुन्हे पाहिले. या गुन्ह्यांना आळा घालणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. मोठ्या गुन्ह्यांमध्ये परप्रांतीय गुन्हेगारांचा वाढता सहभाग पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. इतर राज्यातून येऊन सराईत गुन्हे करुन फरार होत आहेत. परंतु पोलिसांनी देखील आपल्या तपासाच्या कक्षा रुंदावत इतर राज्यात जाऊन गुन्हेगाराच्या मुसक्‍या आवळल्या आहेत. परप्रांतीय टोळ्या सध्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत असल्या तरी पोलिसांनी काही गुन्ह्यांमध्ये आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खासगी आराम बसमधून 2018 अखेरीस एक कोटी रुपयांचे सोने चोरट्यांनी चोरून नेले होते. गुन्हे शाखा युनिट दोनचे सहाय्यक निरीक्षक सतीश कांबळे यांनी कौशल्यपूर्ण तपास करीत मध्य प्रदेशातून दोन आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या.

सहा मार्च 2019 रोजी रहाटणीतील पुणेकर ज्वेलर्सवर दरोडा टाकून 90 लाखापेक्षा अधिक रकमेचे सोने लुटले होते. या गुन्ह्यात आरोपींची माहिती मिळेल, असा कोणताही पुरावा नव्हता. मात्र वाकड पोलिसांनी तब्बल 40 किलोमीटरचे 400 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आरोपींचा पुण्यातील पत्ता मिळविला. मात्र ते हरियानातील गुन्हेगार होते. यापैकी दोन जणांना सहाय्यक निरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने हरियानात जाऊन पकडले तर एका आरोपीचा उत्तर प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये खात्मा केला.

तसेच घरफोडीच्या एका गुन्ह्यात आरोपी वाराणसीवरून विमानाने पिंपरी चिंचवड शहरात येत असे. तसेच आलिशान गाडीतून जात मोठ्या सोसायट्यांमध्ये चोरी करीत असे. या आरोपीलाही वाकड पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली. गेल्यावर्षी शहरातून आलिशान वाहने चोरीस जाण्याचे सत्र सुरू झाला. या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी हाती घेतला. यातील आरोपी हे राजस्थानमधील असल्याचे निष्पन्न झाले. या आरोपींना राजस्थानमधून अटक केली. आलिशान मोटारींचा वापर ते अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

पोलिसांनी तपास केलेल्या बहुतांश गुन्ह्यांमध्ये आरोपींनी कोणताही पुरावा मागे राहू नये, याची काळजी घेतली होती. परंतु पोलिसांनी अशा गुन्ह्यांचाही तपास करीत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अनेक खून प्रकरणातील आरोपी हे परप्रांतीय असून पोलिसांनी त्यांच्या गावी जाऊन किंवा गावी जात असताना त्यांना अटक केली आहे.

चिखली येथील एटीएम फोडण्यात आले. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांच्या एसआयटीने देशात अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या टोळीची माहिती घेतली. पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजचा आधारे आरोपींची ओळख निश्‍चित केली. तसेच त्यांना हरियाना राज्यात जाऊन ताब्यात घेतले.

पिंपरी चौकात 25 डिसेंबर रोजी गुजरातहून आलेल्या एका व्यापाऱ्याला लुटण्यात आले. या गुन्ह्याचा तपास करताना एसआयटीच्या पथकाने आरोपींबाबत माहिती मिळविली. तसेच लुटण्यात आलेल्या व्यापाऱ्याचा गुजरातमधूनच पाठलाग झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यांनी अहमदाबाद ते पुणे असा दुचाकीवर पाठलाग केल्याचे तपासात निष्पन्न झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे आणि सहायक निरीक्षक सतीश कांबळे यांनी तपास करीत आरोपींना गुजरातमधून बेड्या ठोकल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.