चुरशीच्या लढती : सूरजतन दमाणी वि. आप्पासाहेब काडादी

सोलापूर हा कॉंग्रेसचा अभेद्य गड समजला जातो. या शहरात विडी आणि गिरणी कामगारांची, तसेच श्रमिकांची मोठी संख्या आहे. हा वर्ग नेहमीच कॉंग्रेसच्या पाठीमागे उभा राहिला आहे. याचबरोबर सोलापुरातील अल्पसंख्य समाजही कॉंग्रेसच्याच पाठीमागे उभा राहतो. 1977 मध्ये सोलापुरातून कोणाला उमेदवारी द्यावी याचा खल जनता पक्षाच्या त्यावेळच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये चालू झाला. कॉंग्रेसकडून उद्योगपती सूरजतन दमाणी यांचे नाव पक्‍के होते. दमाणी यांना पराभूत करायचे असेल तर आप्पासाहेब काडादी यांच्याशिवाय पर्याय नाही, असे सोलापुरातील त्यावेळच्या समाजवादी चळवळीतील अग्रणी आणि ज्येष्ठ पत्रकार रंगा वैद्य यांनी जनता पक्षाच्या धुरिणांना पटवून दिले.

आप्पासाहेब काडादी हे निष्ठावंत कॉंग्रेसजन होते. 1967 मध्ये ते सोलापुरातून लोकसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर ते सक्रिय राजकारणापासून तसे दूरच होते. सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखाना उभारणीत आप्पासाहेबांचे मोठे योगदान होते. शहरातील प्रबळ अशा लिंगायत समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आप्पासाहेबांना सोलापुरात मोठा मान होता. एक सत्‌शील नेता अशी आप्पासाहेबांची ओळख होती. दीर्घकाळ एका सहकारी साखर कारखान्याची सूत्रे सांभाळूनही आप्पासाहेबांवर गैरव्यवहाराचा एकही आरोप करण्याचे धाडस त्यांच्या विरोधकांना झाले नाही. अशा काडादी यांना जनता पक्षाने उमेदवारी दिली. प्रारंभी आप्पासाहेब निवडणूक लढण्यास तयार नव्हते; मात्र रंगाअण्णा वैद्य यांच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींनी केलेल्या आग्रहापुढे आप्पासाहेबांना निवडणूक लढवण्यास होकार द्यावा लागला.

दमाणी विरुद्ध काडादी ही लढत अत्यंत प्रेक्षणीय झाली. दमाणींकडे प्रचंड पैसा होता. मुबलक साधने होती. काडादींच्या बाजूला सामान्य जनतेचा आदर होता. दमाणी यांच्या विजयासाठी कोणतीही कसूर बाकी ठेवू नका, असा आदेश थेट इंदिरा गांधी यांच्याकडूनच यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक या कॉंग्रेसच्या त्यावेळच्या प्रमुख नेत्यांना आला होता. त्यामुळे यशवंतराव चव्हाणांनी आपले सारे कौशल्य दमाणींसाठी वापरले. सोलापुरातील जनतेच्या मनावर असलेला कॉंग्रेसचा पगडा दूर करणे सोपे नव्हते. मात्र काडादींना समाजात असलेले वजन त्यांना विजयपथावर नेईल असे वाटत होते. सोलापुरातील अनेक कार्यकर्त्यांनी त्यावेळी काडादींच्या विजयासाठी अहोरात्र परिश्रम केले.

जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या प्रचारामुळे आणि आप्पासाहेबांच्या वैयक्‍तिक प्रतिमेमुळे दमाणी पराभूत होणार, अशी हवा तयार झाली होती. याची खबर यशवंतरावांना लागल्यावर त्यांनी तातडीने सोलापुरात येऊन कॉग्रेसमधील मंडळींचे कान पिळले. स्वतः यशवंतरावांनीच लक्ष घातल्यामुळे कॉंग्रेसमधून आप्पासाहेबांना रसद मिळण्याचा मार्ग बंद झाला. मतमोजणीवेळी विजयाचे पारडे कधी काडादींकडे तर कधी दमाणींकडे झुकत होते. अखेर या लढतीत दमाणींनी थोडक्‍या मताधिक्‍याने बाजी मारली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)