बंडाचे आव्हान (अग्रलेख)

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना पक्षाने उमेदवारी दिली नसतानाही त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे आणि पक्षाच्या पहिल्या यादीत आपले नाव नसल्याबद्दल “कालाय तस्मे नमः’ अशी प्रतिक्रिया व्यक्‍त केली आहे. पक्षाच्या दुसऱ्या यादीत खडसे यांचे नाव असेल अशी सारवासारव रावसाहेब दानवे यांनी केली असली तरी पक्षात एकीकडे काहीतरी चांगले घडत असताना दुसरीकडे काहीतरी बिघडत असल्याचे स्पष्ट संकेत यातून मिळत आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत मंत्री विनोद तावडे यांचेही नाव नाही हेही विशेष आहे. या निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा भाजप-शिवसेनेचीच सत्ता येणार अशीच खात्री सर्व स्तरातून व्यक्‍त होत असताना भाजप आणि काही प्रमाणात शिवसेनेलाही उमेदवारीच्या कारणावरून बंडाला आणि नाराजीला सामोरे जावे लागणार आहे.

पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना हे पक्ष स्वतंत्र लढले असल्याने गेल्या पाच वर्षांच्या काळात या दोन्ही पक्षात इच्छुकांची संख्या वाढली. अनेकांनी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती. त्यातच गेल्या काही दिवसांत भाजप आणि शिवसेना या पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात इतर पक्षांतून भरती झाल्याने निष्ठावान आणि उपरे असा संघर्ष उभा राहिला आहे. यावेळी भाजप आणि शिवसेना यांची युती झाल्याने जागावाटपात जागांची संख्या गेल्या वेळच्या तुलनेत खूपच कमी झाली आहे. जागा कमी आणि इच्छुक उमेदवार जास्त अशी स्थिती असल्याने हा नाराजीचा आणि बंडाचा पेच समोर ठाकला आहे.

महायुतीतील जागावाटपाच्या समीकरणावरून हा पेच अधिकच तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण विद्यमान आमदार असलेल्या पक्षालाच यावेळी ती जागा देण्याचा निर्णय झाल्याने भाजप आणि शिवसेना यांच्यातही वाद होऊ लागले आहेत. पुण्यासारख्या मोठ्या शहरात शिवसेनेला एकही जागा देण्यात आलेली नाही. कारण गेल्या वेळी सर्व आमदार भाजपचे होते. राज्यातील अनेक शहरांमध्ये अशीच स्थिती आहे. गेल्या वेळी शहरी मतदार भाजपच्या पाठीशी उभा राहिल्याने शहरात भाजपच्या जागा वाढल्या आहेत. यावेळी तेथे भाजपचे उमेदवार असणे क्रमप्राप्त आहे. अनेक शहरी भागात 10 वर्षांपूर्वी शिवसेनेचे आमदार असले तरी आता त्यांना तेथे संधी नाही.

मुंबई वगळता राज्यात कोणत्याही शहरी भागात शिवसेनेच्या जागा भाजपपेक्षा जास्त नाहीत. पुणे किंवा नाशिक शहरात शिवसेनेला फक्‍त युतीधर्म पाळून भाजपच्या उमेदवारांचे काम करावे लागणार आहे. त्यामुळेही शिवसैनिक नाराज आहेत. नवी मुंबईतील 200 पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे मातोश्रीवर पाठवले हे त्याचे ताजे उदाहरण आहे. पक्षात बाहेरून आलेल्या अनेकांना भाजपने उमेदवारी दिली आहे त्यामुळे अनेक विद्यमान आमदारांचा पत्ता कट झाला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने अनेक खासदारांना उमेदवारी नाकारली होती. यावेळी तीच युक्‍ती वापरून उमेदवारीचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला जाईल; पण त्यामुळे निर्माण झालेली नाराजी आणि बंडाळी याचा किती फटका बसू शकतो याचा विचार भाजपला करावा लागणार आहे. कारण महायुतीतील या नाराजीचा फायदा करून घेण्याची रणनीती विरोधकांनीही आखली आहे.

भाजप आणि शिवसेनेतील नाराज आणि बंडखोर यांना पाठिंबा आणि बळ दिले जाऊ शकते. ताज्या घडामोडीप्रमाणे भाजपने कोकणात कणकवली मतदारसंघात निलेश राणे यांना पक्षाचा फॉर्म दिला आहे. राणे कुटुंबीयांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश झाला नसताना निलेश राणे यांना पक्षाची उमेदवारी जाहीर झाली असेल तर तेथील शिवसैनिकांची भूमिका आता काय असेल हे पाहणे मनोरंजक ठरेल. शिवसेनेच्या विरोधामुळेच नारायण राणे यांचा भाजप प्रवेश सतत लांबत असतानाच भाजपने अशी खेळी केल्याने सिंधुदुर्गात शिवसैनिक राणे यांचे काम करतील, असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. या एकूण नाराजीची आणि बंडाळीची दखल महायुतीला विशेषतः भाजपला घ्यावीच लागेल. कारण भाजप-शिवसेनेच्या उमेदवारी याद्या जाहीर होताच पक्षांचा प्रभाव असलेल्या अनेक ठिकाणी बंडखोरी तीव्रपणे उफाळून आली आहे. नांदेड जिल्ह्यातला लोहा मतदारसंघ शिवसेनेला सोडल्याने खासदार प्रताप पाटील चिखलीकर नाराज झालेत.

गुहागरमधून भास्कर जाधव हे शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत. मात्र, त्यांना शिवसेनेतील नाराजीचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांचं तिकीट कापले आहे. तिकीट कापल्यानंतर सुधाकर कोहळे यांनी माझ्यावर अन्याय झाला आहे, आता कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढची वाटचाल ठरवणार असल्याची भूमिका घेतली आहे. कल्याण पश्‍चिम मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याविरोधात आता भाजपचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले आहेत. कल्याण पश्‍चिमेतील सर्व भाजप नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्यावरून भाजप कार्यकर्ते सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत आहेत. नांदेड जिल्ह्यातील हदगावमध्ये शिवसेनेत जोरदार बंडखोरी उफाळली आहे. विद्यमान आमदार नागेश पाटील यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिल्याने ही बंडाळी उफाळली आहे. ही केवळ काही उदाहरणे आहेत. पक्षातील सुप्त नाराजी अजून समोर आलेली नाही. त्यातच महायुतीच्या इतर घटक पक्षांमध्येही नाराजी आहे. महायुतीतील घटक पक्षांपैकी काही पक्षांतही जागांच्या संख्येवरून बंडाळी झाली तर आश्‍चर्य वाटायला नको.

उमेदवारी दाखल करण्याची मुदत येत्या दोन दिवसांतच संपत आहे. एवढ्या कमी कालावधीत भाजप आणि शिवसेना यांना ही नाराजी आणि बंडाळी थोपवण्याचे काम पूर्ण करावे लागणार आहे. भाजप हा शिस्तीचा पक्ष असून मतदार बंडखोरांना जवळ करीत नाहीत या गृहितकावर विश्‍वास ठेवून निश्‍चिंत राहण्याचे दिवस आता नाहीत हे विसरून चालणार नाही. पुण्यातील कोथरूड मतदारसंघातील मतदारांकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीला होत असलेला विरोध हे बदलत्या परिस्थितीचे उत्तम उदाहरण आहे. राज्यात पुन्हा एकदा सत्तेवर येण्याची खात्री असताना हे गणित बिघडवण्याचे काम पक्षांतर्गत नाराजी आणि बंडखोरीची तीव्रता करू शकते हे लक्षात घेऊनच महायुतीच्या नेत्यांना आगामी पावले टाकावी लागणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.