गड राखण्याचे ‘दादां’पुढे आव्हान

विधानसभा निवडणूक जिंकणार असल्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विश्‍वास


चुरस निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न

– रोहन मुजूमदार

पुणे – बारामती विधानसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत असलेल्या मतदारसंघात गणला जातो. राष्ट्रवादीचे मातब्बर नेते अजित पवार यांनी 1991 पासून म्हणजेच तब्बल सहा टर्म येथे आपणच “दादा’ असल्याचे सिद्ध केले आहे. आता ते 2019च्या विधानसभा निवडणुकीत सातव्यांदा आमदार होणार, असा विश्‍वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

मध्यंतरी भारतीय जनता पक्षाने अजित पवार यांना रोखण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) मदत घेतल्याची चर्चा आहे. तर बारामतीत अजित पवारांना पराभूत करणे शक्‍य नसल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी वक्‍तव्य केले आहे, त्यामुळे “आरएसएस’चे गणितही अजित पवारांपुढे “फोल’ ठरल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात असल्याने या निवडणुकीत शतप्रतिशत अजित पवारच “दादा’ राहणार असल्याचा अंदाज राजकीय विश्‍लेषकांनी व्यक्‍त केला असला तरी “खेळी’ कधीही बदलू शकते, अशी पुष्टीही विश्‍लेषकांनी जोडली आहे. त्यामुळे अजित पवार सातव्यांदाही “गड’ राखणार का? हे पाहणे औत्स्युक्‍याचे आहे

रोखठोक आणि कठोर शैलीसोबतच जनतेचा कैवारी म्हणून अजित पवार यांची बारामती विधानसभा मतदारसंघात ओळख आहे. ही ओळख पुसून काढण्यासाठी भाजपने अनेक योजना आखल्या.

लोकसभा निवडणुकीत जिरायती भागाला मुळशी
धरणाचे पाणी देण्याच्या “वल्गना’ ही केली. मात्र, ही “वल्गना’ जनतेने “फोल’ ठरवत पुन्हा एकदा खासदार सुप्रिया सुळे यांना बारामती विधानसभेतून लाखाचे लीड देऊन आमचा पवार कुटुंबावरच “भरोसा’ असल्याचे दाखवल्यानेच चंद्रकांत पाटील यांना माघार घेण्यास भाग पाडल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

भाजप कार्यालय नावालाच राहणार?
विरोधकांनी अनेकदा पवारांना धोपी पछाड करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यात यश आले नाही. त्याच मुख्य कारण म्हणजे पवारांविरोधात कोणत्याही पक्षाने कार्यकर्त्यांना म्हणावी तशी ताकद दिली नाही. त्यामुळे पवारांविरोधात पुकारलेले बंड टिकले नाही. मात्र, आता भाजपने बारामतीत कार्यालय सुरू करुन कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

निवडणुकीत हे ठरणार कळीचे मुद्दे
धनगर समाजाचे आरक्षण, रेल्वेशी संबंधित प्रश्‍न, जिरायती-बागायती शेतीचे प्रश्‍न, पाण्याची तीव्र टंचाई, साखर कारखान्यांचे राजकारण, रोजगार, हमीभाव, बेरोजगारी, फोल ठरलेली आश्‍वासने यासह अनेक मुद्द्यांनी यंदाची निवडणूक गाजणार यात कोणाचे दुमत नाही.

विरोधात कोण उमेदवार उभा ठाकणार?
राज्यामध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेक दिग्गजांसह कार्यकर्त्यांनी शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्यामुळे या दोन्ही पक्षांची ताकद वाढली आहे. त्यातच शिवसेनेच्या गळालाही अनेक बडे मासे लागल्याने “धनुष्यबाण’ वेगाने सुटत आहेत, त्यामुळेच बारामतीची जागा लढविण्यास शिवसेनेसह भाजप व महायुतीतील राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) ही इच्छुक आहे, त्यामुळे महायुती टिकल्यास ही जागा भाजप-शिवसेना की मित्रपक्ष यांना जाते हे पाहणे औत्सुक्‍याचे असले तरी अजित पवारांसारख्या तगड्या उमेदवारासमोर कोण उमेदवार उभा ठाकणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

कोंडी करण्याचा प्रयत्न
पवारांची बारामती सर करणे तितकेसे सोपे नसल्याचे भाजपसह इतर पक्षांच्या लक्षात आले आहे. जरी बारामती जिंकली नाही, तरी पवार काका-पुतण्यांची बारामतीत कोंडी केल्यास इतर ठिकाणी “गड’ सर करणे फार काठीण नसल्याचे भाजपने लोकसभा निवडणुकीत सिद्ध केले आहे. त्यातच सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचे “भूत’ अजित पवारांच्या मानगुटीवर बसवून त्यांची “कोंडी’चा आटोकाट प्रयत्न सुरू असला, तरी अजित पवार त्यास जुमानत नसल्याने भाजपसह या मतदारसंघात इच्छुक असलेले शिवसेना, रासप रणनीती आखत असली तरी त्यांना तेवढे यश येणे कठीण आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here