पंतप्रधान मोदींना वाराणसीतून ‘हे’ अनोखे उमेदवार देणार आव्हान 

वाराणसी – देशातील बहुचर्चित वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजयाची शक्यता जास्त असली तरीही येथील निवडणुकीचे वातावरण वेगळेच आहे. याचे कारण कि या मतदारसंघातून पंतप्रधान मोदींविरोधात माजी सैनिक, १११ शेतकरी आणि माजी न्यायाधीशही निवडणुकीच्या मैदानात आहेत.

२०१४ साली वाराणसी मतदारसंघातूनच मोदी विजयी झाले होते. त्यावेळीही या जागेवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मोदींना आव्हान देणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु, यंदा नवख्या विरोधकांनी या निवडणुकीची रंगत वाढविली आहे. पंतप्रधान मोदींना टक्कर देण्यासाठी तामिळनाडूच्या शेतकऱ्यांसोबत माजी सैनिकही सज्ज झाले आहेत.

कोलकत्ता उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश चिन्नास्वामी स्वामीनाथन कर्णन यांची मोदींना वाराणसी मतदार संघातून आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने अवमान प्रकणात दोषी ठरवलेले कर्णन हे पहिले न्यायाधीश आहेत. २०१७ मध्ये त्यांना ६ महिन्यांसाठी जेलमध्येही शिक्षा भोगावी लागली होती. आता ते भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई करू इच्छितात. यासाठी त्यांनी अँटी करप्शन डायनॅमिक पार्टीही २०१८ मध्ये बनविली आहे. ६३ वर्षाचे माजी न्यायाधीश कर्णन यांनी सेंट्रल चेन्नई येथून उमेदवारी अर्ज दाखल केला असून वाराणसी मतदारसंघातूनही निवडणूक लढविणार आहेत.

सीमा सुरक्षा दलातून (बीएसएफ) बडतर्फ करण्यात आलेले जवान तेजबहादूर यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा संकल्प जाहीर केला आहे. बीएसएफच्या जवानांना निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवले जात असल्याची तक्रार केल्यामुळे सुमारे दोन वर्षांपूर्वी त्यांचे नाव मोठ्या चर्चेत आले होते. याद्वारे तेजबहादूर यादव जवानांच्या समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी आणि लोकांमध्ये एक संदेश पोहचवण्यासाठी निवडणूक लढविणार आहेत.

याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध तामिळनाडूचे १११ शेतकरी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. २०१७ मध्ये राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांनी सरकारविरोधात निदर्शने केली होती. या १११ शेतकऱ्यांच्या समूहाचे नेतृत्व पी अय्यकन्नू करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.