फुरसुंगी उपनगर वार्तापत्र : महादेव जाधव
पूर्व हवेली तालुक्यातील धार्मिक व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखीमार्ग म्हणून प्रसिद्ध असलेला पुणे-सासवड मार्ग व मंतरवाडी-कोंढवा बाह्यवळण मार्ग, कोंढवा-बोपदेव घाट मार्ग सुनियोजित विकासाच्या दृष्टीने चांगली वाटचाल करत आहे.
पुणे महापालिका हद्दीलगत पाच ते दहा किलोमीटर अंतरावर हडपसर उपनगराशेजारी असलेल्या फुरसुंगी, भेकराईनगर, ऊरुळी देवाची, वडकी, हांडेवाडी, उंड्री, पिसोळी, वडाचीवाडी, होळकरवाडी, येवलेवाडी, कोंढवा या गावांचा विकासआराखडा आखताना महानगरपालिकेसमोर धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा जपण्याचे मोठे आव्हान आहे.
सह्याद्रीच्या उंचच उंच पर्वत रांगा, विलोभनीय निसर्गसौदर्याची खाण, हिरवीगर्द झाडी, रंगीबेरंगी रानफुले, डोंगरदऱ्यातून झुळझुळणारे, खळखळणारे झरे, धबधबे, विविध पक्ष्यांचा किलबिलाट, डोंगर पायथ्याशी गर्द निळ्या पाण्याने भरलेले छोटेमोठे तलाव, धार्मिक व ऐतिहासिक स्थळे, भोवतालच्या जगाचा विसर पाडायला लावणारी शांतता… हे सर्व निसर्ग चित्र असूनही या गावांत दिसते.
या गावांचा समावेश आता महानगरपालिकेत झाला आहे. अद्याप तरी ही गावे धार्मिक व ऐतिहासिक वारसा जपत सुनियोजित विकासाकडे वाटचाल करत आहेत. परंतु, विकासआराखडा आखताना इमारती, मॉल्स, आयटी पार्क, संकुले याचा विचार करतानाच येथील निसर्ग सौंदर्याला बाधा येणार नाही, याची काळजी पालिकेने घेणे गरजेचे ठरणार आहे.
विकास अन् वाहतूक व्यवस्था…
सासवड मार्ग व मंतरवाडी-कोंढवा बाह्यवळण मार्ग हे या गावांच्या दळण-वळणाच्या दृष्टिने महत्त्वाचे आहेत, असताना याच रस्ता भागातील गावे विकसीत होत आहेत. सासवड मार्गाचे चौपदरीकरण तसेच वडकी येथून डोंगराच्या बाजूने जाणारा नियोजित रींगरोड. तसेच, पुरंदरमध्ये होणार आंतराष्ट्रीय विमानतळ यामुळे हे भेकराईनगर, तुकाई दर्शन, ऊरुळी देवाची, वडकी, हांडेवाडी, उंड्री, पिसोळी, कोंढवा, येवलेवाडी या परिसराची “व्हॅल्यू’ वाढवत आहेत. गेल्या काही वर्षात या भागाचे नागरीकरण वाढण्यामागे हेच महत्त्वाचे कारण मानले जात आहे. तरीही या भागाने धार्मिक, ऐतिहासिक व निसर्गसौदर्याचे जतन केले आहे, त्यामुळे या भागाच्या सुनियोजित विकासाचे पालिकेपुढे आव्हान असणार आहे.
पाणीपुरवठा…
महापालिकेत सदर गावे घेत असताना या गावांसाठी पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी नव्याने योजना करण्याबरोबरच सद्यस्थितीतील योजनांची दुरूस्ती आणि नैसर्गिक स्त्रोत जपण्यासाठी पालिकेला प्रयत्न करावे लागतील. या भागासाठी पाण्याची मुबलकता हे दिवेघाटापर्यंत वरदान ठरलेली आहे. तर, फुरसुंगी परिसरातून बारमाही वाहणारा मुळा-मुठा कालवा, वडकी येथील मस्तानी तलाव, कानिफनाथगडाच्या पायथ्याशी असलेला मोठा पाझर तलाव, बंधारे, छोटे-मोठे तलाव याचा वापर पालिकेला या गावांसाठी करता येईल. सुयोग्य नियोजन असेल तर हे पाणी या गावांना वर्षभर पुरेल.
धार्मिक स्थळांसाठी तरतूद…
फुरसुंगी येथील पुरातन श्री शंभू महादेवाचे मंदिर, रामदरा येथील श्रीरामाचे मंदिर, उरुळी देवाची येथे प्राचीन भैरवनाथ मंदिर, भेकराईनगरला भेकराईमाता मंदिर, तुकाईमातेचे मंदिर, कोंढवा येथे जगविख्यात इस्कॉन मंदिर, पुण्यधाम आश्रम,कोंढव्याचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर तसेच विविध देवीदेवतांची मंदिरे असल्याने सदर गावे पालिकेत येत असताना या धार्मिक स्थळांसाठीहीच्या वाढीव निधीची तरतूदही पालिकेला ठेवावी लागणार आहे.