जयपूर – शेतकरी आंदोलकांनी पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनाला राजस्थानात मोठा प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांनी राज्यात ठिकठिकाणी हे आंदोलन केले. गंगानगर, हनुमान नगर, धोलपुर, झलवार येथे शेतकऱ्यांनी रस्ते वाहतूक काही काळ अडवली.
आंदोलकांनी ठिकठिकाणी रस्त्यावरच ठिय्या मांडल्याने वाहतूक बंद पडली होती. पण पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना तेथून हुसकाऊन लावले. मात्र यावेळी कोठेही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही. राजस्थान प्रदेश कॉंग्रेसने या आंदोलनाला पाठिंबा दिला होंता.
अखिल भारतीय कॉंग्रेस समितीने दिलेल्या आदेशानुसार शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला प्रदेश कॉंग्रेस तर्फे ठिकठिकाणी मदत करण्यात आल्याची माहिती प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गोविंदसिंह दोस्तरा यांनी दिली.
राजस्थानात कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचा भावना तीव्र असून ठिकठिकाणी याच्या विरोधात महापंचायती आयोजित केल्या जात आहेत. त्यात मोठ्या संख्येने शेतकरी व त्यांचे कुटुंबिय उपस्थित राहात आहेत.