प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 3 -महापालिका भवनात नुसतेच खुर्च्या उबवत बसलेल्या डॉक्टरांची संख्या भरपूर असून, रुग्णालयांत-ओपीडीत मात्र डॉक्टरच नाहीत, अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे हे डॉक्टर “पर्मनंट’ असून, महापालिका त्यांना दरमहा सव्वा ते दोन लाख रुपये पगार मोजत आहे.
महापालिका भवनात सुमारे चार एमबीबीएस, एमडी अशा सात ते आठ जणांना “ऑफिस वर्क’ लावण्यात आले आहे. “ऑफिस वर्क’ म्हणजे या विभाग प्रमुखाकडून त्या आणि त्याच्याकडून दुसरीकडे गप्पा मारत फिरण्याचेच काम हे डॉक्टर करत असून, केवळ खुर्ची उबवणे एवढेच काम त्यांच्याकडून केले जात असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात होत आहे.
हे डॉक्टर “क्लास वन’च्या खुर्चीवर बसतात आणि केवळ सोनोग्राफी करतात. तेही आठवड्यातून दोन ते तीन वेळा. सीझर, आयपीडी या किचकट गोष्टी त्यांना नको आहेत. महापालिकेच्या कमला नेहरू, सुतार दवाखाना तसेच येरवड्यातील रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर नाहीत. अनेकदा प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला “गुंतागुंत’ असल्याचे सांगून ससूनला पाठवले जाते आणि तेथे त्यांचे “नॉर्मल’ बाळंतपण होते, ही वस्तुस्थिती आहे.
जर हे तज्ज्ञ डॉक्टर महापालिकेच्या 18-19 मॅटर्निटी होममध्ये गेले तर कमला नेहरू आणि ससूनवरील भार हलका होण्याला मदत होईल, मात्र हे स्त्रीरोगतज्ज्ञ कार्यालयात बसून, क्लार्कप्रमाणे फायली घेऊन फिरण्याचे काम करतात. त्यांना दोन-दोन वर्षे एकाच ठिकाणी क्लार्कचे काम करत बसवले जात असल्याने त्यांना ऑपरेशनचा सरावही राहात नाही.
याशिवाय महापालिकेच्या “पे रोल’ वर तीन रेडिओलॉजिस्टही आहेत. त्यांनी सोनोग्राफी करणे आवश्यक आहे, असे असताना “एमडी’ आणि क्लास वन असलेले डॉक्टर सोनोग्राफी करतात. एखाद्या रुग्णाचा बीपी वाढला की साधी गोळी देऊन संबंधित रुग्णाला अन्य ठिकाणी पाठवून दिले जाते. सध्या करोनाप्रतिबंधक लसीकरणाचे काम सुरू असल्याने यातील चार जणांना “व्हॅक्सीन ऑन व्हील्स’या मोहिमेत रुजू केले आहे. मात्र ते झाल्यानंतर पुन्हा ते फायली फिरवत खुर्च्या उबवण्याचेच काम करणार हे निश्चित आहे. त्यामुळे स्टाफ आहे; परंतु त्याचा योग्य वापर होताना दिसत नाही.
एकही डॉक्टर “एक्स्ट्रा’नाही. सगळ्या कामाच्याच डॉक्टरांना येथे बसवले आहे. याशिवाय रुग्णालयांमध्ये, ओपीडीमध्ये पुरेसे मनुष्यबळ आहे.
-डॉ. आशिष भारती,
आरोग्य प्रमुख,
पुणे महापालिका