कामशेत पोलिसांचे यश : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कारवाई
कामशेत – जुना मुंबई-पुणे महामार्गावर गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी कामशेत पोलिसांनी जेरबंद केली. यावेळी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले तर अंधाराचा फायदा घेऊन एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला.
बाबू हुसेन शेख (वय-36, रा. वाशी मुंबई ), जितेंद्र अमल सरोज उर्फ मनिष (वय-19, रा. वाशी मुंबई), उमेश बाबुराव गायकवाड (वय-15, रा. वाशी मुंबई), चांद दत्ता राणे (वय-14 रा. वाशी मुंबई) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यावेळी पाचवा आरोपी गुरू (पूर्ण नाव माहीत नाही ) हा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 18) पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक बी. बी. पाटील, सहायक फौजदार दत्तात्रय खंडागळे, पोलीस हवालदार अजय दरेकर, पोलीस नाईक शिंदे हे कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.
यावेळी त्यांना मिळालेल्या खबरीवरून कामशेत गावच्या हद्दीत जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर एका ढाब्याच्या जवळ पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास नाकाबंदी करून आरोपींना जेरबंद केले. पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत खिंडीच्या अलिकडे नाकाबंदी करून ही कारवाई करण्यात आली. यावेळी या टोळीकडून लोखंडी तलवार, लोखंडी रॉड, लाल मिरचीची पावडर, घातक हत्यारे आणि होंडा अमेझ कार असा एकूण चार लाख 395 रुपयांचा माल जप्त करण्यात आला.