पुणे – शहरात पुन्हा एकदा साखळी चोर सक्रीय झाले असल्याचे दिसत आहे. मागील दोन दिवसांत घडलेल्या दोन घटनांमध्ये दिड लाखाचे दागिने हिसकावण्यात आले. या दोन्ही घटनांचे सीसीटीव्ही पोलिसांना मिळाले आहेत.
विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात एका 21 वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीनूसार तीचे 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिला आणी त्यांची सासू सायंकाळी पावणेसातच्या सुमारास भाजीपाला घेऊन आळंदी रस्त्याने घराकडे चालल्या होत्या. यावेळी पाठिमागून आलेल्या एका अनोळखी व्यक्तींने त्यांच्या गळ्यातील 15 ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावून कळस गावाच्या दिशेने पायी पळून गेला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सातपुते करत आहेत.
दुसऱ्या एका घटनेत एका 38 वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात 90 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावल्याची तक्रार दिली आहे. त्यानूसार दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींविरुद्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यांदी तालाब मस्जीद समोरील रस्त्यावरुन पायी चालल्या होत्या. त्या रस्ता ओलांडत असताना दुचाकीवरुन समोरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या गल्यातील 30 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावले. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.