चाफळ-कराड एसटी सेवा बंद? नागरिकांना आर्थिक भुर्दंड

शटल सेवा सुरू करण्याची चाफळ भागातील लोकांची मागणी
चाफळ (वार्ताहर) –
लॉकडाऊनमध्ये शिथील झाल्यानंतर राज्यात सर्वत्र सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करत एसटी सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा लालपरी सर्वत्र धावताना दिसत आहे. मात्र, चाफळ विभागाने पत्रव्यवहार करून, प्रत्यक्ष भेटूनही येथील शटल सेवा सुरू करण्याची मागणी करूनही अद्याप एसटी सुरू झालेली नाही. परिणामी नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे तातडीने येथील एसटी सेवा सुरू करण्याची मागणी होत आहे.

डोंगरदुर्गम भागात ये-जा करण्यासाठी प्राधान्याने एसटीकडे पाहिले जाते. मात्र, करोनामुळे बंद करण्यात आलेली एसटी सेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सर्व नियमांचे पालन तसेच सर्व काळजी घेऊन एसटीचा प्रवास सुरू झाला आहे. सुरूवातीला जिल्हा पुरता मर्यादित असलेला एसटी प्रवास आता संपूर्ण राज्यात कोणत्याही पासशिवाय सुरू झाला आहे. मात्र, ग्रामीण आणि डोंगरदुर्गम भागात अजून एसटीच्या नियमित फेऱ्या सुरू झाल्याचे दिसत नाही.

चाफळ विभागात एसटी सेवा सुरू करण्याची मागणी करून ही येथील शटल सेवा सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे तातडीच्या कामासाठी जादा पैसे मोजून खासगी वाहनाची मदत घ्यावी लागत आहे. तर कॉलेज प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची एसटी विना मोठी गैरसोय होत आहे. तर येथील 50 ते 60 वाड्या-वस्त्यांतील नागरिकांना जीवनावश्‍यक वस्तूंची खरेदी, औषधोपचारासाठी प्रवास करावा लागतो. हे लक्षात घेऊन चाफळ-कराड ही शटल सेवा व चाफळ मार्गे उंब्रज पाटण या फेऱ्या त्वरित पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी चाफळसह विभागातील वाड्या-वस्त्यांतील विद्यार्थ्यासह नागरिकांमधून होत आहे.

चाफळ येथून सातारा, कराड व पाटणला जायचे झाल्यास नागरिकांना उंब्रज येथे जावे लागते. मात्र एसटी बसेस नसल्याने प्रवाशांना जादा पैसे देऊन खासगी वाहनाने उंब्रजपर्यंत जाणे भाग पडत आहे. ज्यांच्याकडे दुचाकी, चारचाकी वाहने आहेत ते फक्त आपल्या वाहनाने जातात. इतरांना मात्र, खासगी वाहन करण्याशिवाय पर्याय राहत नाही. परिणामी मोठा आर्थिक तोट्यासह मोठी गैरसोय होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.