जुलै महिन्यातील महागाईचा दर सात टक्क्यांजवळ
नवी दिल्ली – जुलै महिन्यातील महागाईचा दर 6.93 टक्के झाला आहे. या महिन्यात अन्नधान्याच्या किमती वाढल्यामुळे एकूणच महागाईचा दर वाढला असल्याचे दिसून येते.
जुलै महिन्यामध्ये अन्नधान्यांच्या महागाईचा 9.62 टक्के मोजला गेला आहे. किरकोळ किमतीवरील आधारित या महागाईचा दर जून महिन्यामध्ये 6.23 टक्के होता. त्यामध्ये आता वाढ झाली आहे. याचा अंदाज रिझर्व्ह बॅंकेला आला होता. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या पतधोरणात व्याजदरात कपात केली नव्हती.
रिझर्व्ह बॅंकेने भांडवल सुलभतेपेक्षा महागाई रोखण्यास प्राधान्य दिल्यामुळे व्याजदरात कपात केली नाही, असे समजले जाते. बॅंकेने या वर्षात महागाईचा दर चार टक्क्यांच्या आत रोखण्याचे ठरविले आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यापासून या महागाईचा दर चार टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
विश्लेषकांनी सांगितले की, सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्कात वाढ केल्यामुळे डिझेलचे दर जास्त आहेत. वाहतुकीसाठीच्या खर्चात वाढ झाली आहे. वाहतुकीचा खर्च वस्तूच्या किमतीमध्ये समाविष्ट होतो. त्यामुळे महागाई वाढली आहे, असे सांगण्यात आले.