“अविश्‍वास मंजूर’ होऊनही सीईओ माने हजर

माने यांच्या बाबत विचारणा करताच अध्यक्षांनी ठेवले कानावर हात  
नगर – जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने एकमताने अविश्‍वास ठराव आणल्यानंतरही देखील मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने सोमवारी (दि.22) रोजी 15 दिवसांची रजा संपल्यावर जिल्हा परिषदेत हजर झाले आहेत. दरम्यान, अध्यक्षा शालिनीताई विखे या देखील सहा दिवसानंतर जिल्हा परिषदेत आल्या होत्या. त्यांच्याकडे मानेबाबत विचारणा करता त्यांनी कानावर हाथ ठेवत त्यांना या प्रकरणी काहीच माहित नसल्याचे स्पष्ट केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांच्या वर 8 जुलैला झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सैनिक पत्नीची बदली आणि अन्य कारणामुळे अविश्‍वास ठराव आणण्यात आला होता. दरम्यान, त्यापूर्वीच माने यांना सक्‍तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. अविश्‍वास ठराव आणल्यानंतर माने यांची राज्य सरकार अन्यत्र बदली करतील असा जिल्हा परिषद सदस्यांचा कायास होता. मात्र, तसे न होता सरकारच्या ग्रामविकास विभागाने माने यांच्यावर दाखल अविश्‍वासाची चौकशीचे आदेश दिले आहेत.

यामुळे जिल्हा परिषद सदस्य संतप्त झाले आहेत. सरकार जिल्हा परिषद सदस्यांच्या भावना आणि मागणीला धुडकावत असल्याचा सदस्यांचा आरोप आहे. तसेच ग्रामविकास विभागाच्या कायद्यात अविश्‍वास पारित झालेला असतांना त्यांची पुन्हा चौकशी करण्याचे तरतूद नसतांना ही अशी चौकशी लावलीच कशी असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला आहे. यावर चर्चा करण्यासाठी आज काही सदस्य जिल्हा परिषदेत ऐकत्र येणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, माने काल हजर झाल्यानंतर त्यांनी तडक शिर्डीला बैठकीला जाणे पसंत केले. शिर्डीला येत्या महिनाअखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सरपंच परिषद होणार असून त्यांच्या नियोजनासाठी माने गेले होते. तर दुपारून अध्यक्षा विखे पाटील जिल्हा परिषदेत आल्या होत्या. त्यांना माने प्रकरणाविषयी विचारणा केली असता त्यांनी कानावर हाथ ठेवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)