नवी दिल्ली– मणिपूरच्या काही भागांत पुन्हा सशस्त्र दले विशेषाधिकार कायदा (अफ्स्पा) लागू करण्यात आला. मागील काही दिवसांत हिंसाचाराच्या घटनांचे सत्र घडल्याने केंद्र सरकारने ते पाऊल उचलले.
मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात सोमवारी दहशतवाद्यांनी पोलीस ठाण्यावर आणि नजीकच्या सीआरपीएफ छावणीवर हल्ला केला. त्यानंतर झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी १० दहशतवाद्यांना ठार केले. त्या चकमकीदरम्यान दहशतवाद्यांनी ३ महिला आणि तितकीच बालके अशा मिळून ६ जणांचे अपहरण केले. त्या घटनेच्या निषेधार्थ इंफाळ खोऱ्यात निदर्शनांचे सत्र सुरू झाले.
त्याशिवाय, हिंसाचाराच्या आणि शस्त्रास्त्रे, दारूगोळा साठे सापडण्याच्या घटना घडल्या. त्या पार्श्वभूमीवर, अशांत स्थितीचे कारण देत केंद्रीय गृह मंत्रालयाने पुन्हा अफ्स्पा लागू करण्याचा निर्णय घेतला. जिरीबामसह ६ पोलीस ठाण्यांच्या हद्दींमध्ये येणाऱ्या भागांत तो कायदा अंमलात असेल. त्या कायद्यांतर्गत संबंधित भागांना अशांत म्हणून जाहीर केले जाते. तिथे सशस्त्र दलांना तपासणी, अटक आणि गोळीबार करण्याचे विशेषाधिकार प्राप्त होतात.