नवी दिल्ली – दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मनमोहन यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यास केंद्र सरकारने मंगळवारी मंजुरी दिली. न्यायमूर्ती मनमोहन सध्या दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. ते नोकरशहा आणि शक्तिशाली नेते जगमोहन यांचे पुत्र आहेत.
केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ट्विटरवर पोस्ट केले की, भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचा वापर करून आणि राष्ट्रपती आणि देशाच्या मुख्य न्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, न्यायमूर्ती मनमोहन यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
न्यायमूर्ती मनमोहन यांचा जन्म १७ डिसेंबर १९६२ रोजी दिल्लीत झाला. बाराखंबा रोड येथील मॉडर्न स्कूलमधून त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधून इतिहास विषयात बीए (ऑनर्स) पदवी प्राप्त केली. त्यांनी डीयूच्या कॅम्पस लॉ सेंटरमधून एलएलबी पदवी प्राप्त केली आणि 1987 मध्ये दिल्ली बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून नोंदणी केली.