#IPL2020 : फ्युचर समूहानेही बीसीसीआयशी घेतली फारकत

मुंबई –आयपीएल स्पर्धेच्या आयोजनाची चिंता काही केल्या कमी होताना दिसत नसून मुख्य प्रायोजक व्हिवोने करार संपुष्टात आणल्यानंतर आता फ्युचर समूहानेही बीसीसीआयशी फारकत घेतली आहे. 

अर्थात, आता स्पर्धेला फटका बसणार असे विधान काही सदस्यांनी केल्यावर त्यांना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. तुम्हाला तोटा होणार नसून केवळ नफा कमी होणार आहे, अशा प्रतिक्रिया काहींनी व्यक्‍त केल्या आहेत.

देशात चीनबाबत असंतोष वाढत गेल्याने व्हिवोशी असलेला करार मोडण्यासाठी बीसीसीआयवर दडपण येत होते. अखेर जनभावनेचा आदर करत हा करार संपुष्टात आला व ड्रीम 11 या कंपनीने मुख्य प्रयोजकता दिली. मात्र, आता सहप्रायोजक असलेल्या फ्युचर समूहाने करार मोडल्याने बीसीसीआयला नवा सह प्रायोजक शोधावा लागणार आहे.

आयपीएलला गेल्या पाच वर्षांपासून या समूहाकडून सहप्रायोजकता मिळत होती. आता अचानक या समूहाने आयपीएलबरोबरचा करार रद्द केला असून आयपीएल समितीनेही आपल्या संकेतस्थळावरून या समूहाचे नाव काढून टाकले आहे. आता आयपीएलसाठी पुन्हा एकदा बीसीसीआयला सहप्रायोजक शोधावा लागणार आहे.

वेळापत्रकाला दिरंगाई का?

आयपीएल स्पर्धा येत्या 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत अमिरातीत होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघ दाखलही झाले आहेत. त्यांना पुढील काही दिवस करोनाच्या धोक्‍यामुळे विलगीकरणातही राहावे लागणार आहे. मात्र, स्पर्धा जर होणार आहे तर मग त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यास इतका विलंब का केला जात आहे, असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे. सर्व संघांना दिलासा मिळेल असे वेळापत्रक जाहीर करू, असे सांगूनही बीसीसीआयने अद्याप ते जाहीर केलेले नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.