सांगवी – केंद्रीय आरक्षणात मराठा समाजाचा समावेश व्हावा, म्हणून केंद्र सरकारने राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे शिफारस करावी आणि आरक्षणाची मर्यादा वाढविण्याची शिफारसीचे लोकसभा, राज्यसभा पटलावर असलेल्या बिलाला मंजुरी द्यावी. सदरची मागणी मंजूर व्हावी, यासाठी लोकसभा अधिवेशन काळात मराठा क्रांती मोर्चा दिल्लीत धडकणार आहे.
लोकसभा अधिवेशन संपण्यापूर्वी म्हणजे 5 एप्रिल रोजी मराठा क्रांती मोर्चा दिल्लीत धडकणार असून, लोकसभेवर मोर्चाचे आयोजन करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख व मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
रामभाऊ जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, की घटनेतील तरतुदीमधील परिच्छेद 340 नुसार आयोगाची नियुक्ती न्यायमूर्ती एम. जी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. आयोगाने घटनेतील 15(4) आणि 16(4) मधील तरतुदीनुसार सामाजिक मागास व शैक्षणिक मागास प्रवर्ग जाहीर केला अशा या घटनात्मक आयोगात बोगस म्हणणारे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा व समस्त महाराष्ट्राची माफी मागावी, अशी आमची मागणी आहे.
सर्वोच्च न्यायालयात अडकलेले सामाजिक आणि शैक्षणिक प्रवर्गातील आरक्षण मार्गी लागेल, स्थगिती उठेल, त्यासाठी सबळ पुरावे सादर करून विधितज्ज्ञ सक्षमपणे मांडणार आहेत; परंतु असे असले तरी केंद्रीय आरक्षणाची मर्यादा वाढावी, यासाठी मराठा क्रांती मोर्चा दिल्लीवर धडक देणार आहे.