मध्य रेल्वेचे 70 व्या वर्षात पदार्पण

आजमितीस सुमारे 4 हजारपेक्षा अधिक किलोमीटरपर्यंत विस्तार

पुणे – राज्यातील विविध भागांतून धावणाऱ्या मध्य रेल्वेने गुरुवारी (5 नोव्हेंबर) 70 व्या वर्षात पदार्पण केले. तत्कालीन “ग्रेट इंडियन पेनीन्सुला’ची उत्तराधिकारी असणाऱ्या मध्य रेल्वेचा आजमितीस सुमारे 4 हजार अधिक किलोमीटरपर्यंत विस्तार झाला असून, पाच विभागांत 466 स्थानकांचे जाळे पसरले आहे. या वर्धापन दिनानिमित्त मध्य रेल्वेचे मुख्यालय असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे विद्युत रोषणाई केली होती.

आशियातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे या मार्गावर 16 एप्रिल 1853 रोजी धावली. त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. तर बोरी बंदर येथील स्थानकांत नागरिकांची गर्दी होती. बॅन्ड वाजविण्यात आला, सलामी देण्यात आली. हिरवा झेंडा दाखवल्यानंतर तीन इंजिनासह गाडी लाकडी स्थानकातून बाहेर पडली.

कालांतराने ग्रेट इंडियन पेन्सिन्सुला रेल्वेचा विस्तार झाला. उत्तरेकडे दिल्ली, ईशान्येकडे कानपूर आणि अलाहाबाद, पूर्वेकडे नागपूर तर दक्षिण-पूर्वेत रायचूरपर्यंत सीमा विस्तारल्या. मुंबई येथून भारताच्या बहुतांश भागांत संपर्क झाला. त्यावेळी जीआयपीचा रेल्वेमार्ग सुमारे 2 हजार 575 किलोमीटरचा होता. 2003 मध्ये आणखी सात झोन तयार केले.

सध्या मध्य रेल्वेचे 5 विभाग आहेत. पुणे, मुंबई, भुसावळ, नागपूर आणि सोलापूर या विभागांत 466 स्थानकांचे नेटवर्क आहे. सध्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांतून 4 हजार 151.93 किलोमीटर इतका रेल्वेमार्गाचा विस्तार झाला आहे.

दररोज अंदाजे साडेचार दशलक्ष प्रवासी वाहून नेणारे जगातील सर्वात मोठे उपनगरी नेटवर्क आहे. करोना कालावधीत मध्य रेल्वेने देशाच्या विविध भागांत पुरवठा साखळी सुनिश्‍चित करत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

असा होता मध्य रेल्वेच्या रचनेचा मार्ग
सन 1900 – “जी.आय.पी.’ रेल्वे कंपनीत भारतीय मिडलॅंड रेल्वे कंपनीचे विलिनीकरण
5 नोव्हेंबर 1951 – निजाम, सिंधिया आणि धौलपूर राज्य रेल्वे एकत्रित करून मध्य रेल्वेची स्थापना
ऑक्‍टोबर 1966 – मध्य रेल्वेतील सोलापूर विभाग आणि दक्षिण रेल्वेतील सिकंदराबाद, हुब्बळी, विजयवाडा या विभागांना विलीन करून दक्षिण मध्य रेल्वेची स्थापना
2 ऑक्‍टोबर 1977 – सोलापूर विभाग मध्य रेल्वेत विलीन आणि दक्षिण रेल्वेतील गुंटकल विभाग दक्षिण मध्य रेल्वेमध्ये समाविष्ट
सन 2003 – सात झोनची निर्मिती
सन 2003 – मध्य रेल्वेच्या जबलपूर आणि भोपाळ विभागांचा पश्‍चिम रेल्वेमध्ये समावेश, तर झाशी विभागाचा उत्तर-मध्य रेल्वेमध्ये समावेश

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.