वादग्रस्त व्हिडिओ क्लिपची सत्यता पडताळण्याची विद्यार्थ्यांची मागणी
जेहनाबाद : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी आणि सुधारीत नागरीकत्व कायद्याच्या (का) विरोधातील निदर्शनांचा सूत्रधार शरजील इमाम याच्या घरावर गुप्तचर खात्याच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी छापा टाकला. इमामवर जामिया मिलिया आणि शाहीन बाग येथील सभेबाबत देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.
जेहनाबादचे पोलिस अधिक्षक मनिषकुमार यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, शरजील इमाम याच्या काको पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घरावर केंद्रीय गुप्तचर खात्याच्या पथकाने रविवारी रात्री छापा टाकला. त्यांनी मदत मागितल्यामुळे त्यांना संरक्षण व्यवस्था पुरवण्यात आली. याच यंत्रणेतर्फे त्याच्या विरोधातील गुन्ह्याचा तपास सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
शरजील हा घरी सापडला नाही. त्यामुळे त्याचे दोन नातेवाईक आणि मोटार चालकांना ताब्यात घेतले. काही काळ त्यांची चाकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले, असे ते म्हणाले. आयआयटी मुंबईतील कम्पुटर सायन्सचा पदवीधर असणारा शरजील जेएनयुमध्ये इतिहासाच्या अभ्यासासाठी दाखल झाला आहे.
देशातील का कायद्याच्या पार्श्वभूमीवर आसामला देशापासून तोडता येऊ शकते, अशी शक्यता मांडणारे वक्तव्य शरजीलने केल्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्या क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करून सत्यता पडताळण्याची गरज जेएनयुमधील काही विद्यार्थी मांडत आहेत. अशाच बनावट क्लिपच्या आधारे कन्हैय्या कुमारवर काही वर्षापुर्वी गुन्हा नोंदवण्यात आला होता याकडे हे विद्यार्थी नाव न छापण्याच्या अटीवर लक्ष वेधत आहेत.