कृषी क्षेत्राच्या बळकटीसाठी केंद्र सरकार प्रयत्नशील – पंतप्रधान

अहमदाबाद  – देशातील कृषी क्षेत्राच्या बळकटीसाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. देशातील शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये असे सरकारचे प्रयत्न आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. गुजरातमध्ये तीन महत्त्वाच्या योजनांचे मोदींच्या हस्ते आज उद्‌घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते. कृषी, आरोग्य आणि पर्यटन विकासाच्या संबंधातील या तीन योजना आहेत त्याचे मोदींनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उद्‌घाटन केले.

यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे आणि त्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना आपला माल कोठेही विकण्याची अनुमती देऊन,तसेच बंद पडलेल्या जलसिंचन योजनांच्या पुर्ततेला गती देऊन तसेच सुधारित पीक विमा योजना लागू करून सरकारने शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घेतली आहे. तसेच शेतकऱ्याला त्याच्या शेताच्या मातीचे परीक्षण करून सॉईल हेल्थ कार्ड दिले जात आहे. युरियाचा काळाबाजार रोखण्यासाठी नीम कोटिंगचा युरिया त्यांना पोहचवला जात आहे. अशाच स्वरूपाचे प्रयत्न सरकारकडून यापुढेही सुरूच राहतील असे मोदींनी यावेळी नमूद केले.

गुजरात सरकारने शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी किसान सुर्योदय योजना सुरू केली आहे त्याचे मोदींनी आज उद्‌घाटन केले. अहमदाबादच्या यु. एन. मेहता संस्थेत सुरू करण्यात आलेल्या पॅडियाट्रिक हार्ट हॉस्पिटलचेही त्यांनी उद्‌घाटन केले. तसेच गिरनार पर्वतावरील रोपवेचेही उद्‌घाटन केले. गिरनार रोपवे प्रकल्प पूर्ण होण्यास विरोधकांनी अडथळे आणल्याचा आरोपही मोदींनी केला. या प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुरीचे अडथळे आणले गेले.

युपीए सरकारने 2011 मध्ये या प्रकल्पाला मंजुरी दिली अशी माहिती त्यांनी दिली. त्यांनी ही परवानगी अडवली नसती तर गिरनारचा रोप वे प्रकल्प या आधीच पूर्ण झाला असता असे ते म्हणाले. गुजरातमध्ये उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला आत्तापर्यंत 45 लाख लोकांनी भेट दिल्याची माहितीही मोदींनी यावेळी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.