नवी दिल्ली -चुकीचा नकाशा प्रसिद्ध केल्याबद्दल केंद्र सरकारने ट्विटरला नोटीस बजावली आहे. भारताच्या अखंडतेचा अनादर केल्याबद्दल कायदेशीर कारवाई का केली जाऊ नये, अशी विचारणा त्या नोटिसीद्वारे करण्यात आली आहे.
ट्विटरने प्रसिद्ध केलेल्या नकाशात लेह हा जम्मू-काश्मीरचा भाग दाखवण्यात आला आहे. खरेतर लेह हा लडाख या केंद्रशासित प्रदेशाचा भाग आहे. त्या चुकीबद्दल केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाकडून 9 नोव्हेंबरला ट्विटरला नोटीस बजावण्यात आली. तसेच, पाच दिवसांत स्पष्टीकरण मागवण्यात आले. याआधी मागील महिन्यात एक अक्षम्य चुकीवरून ट्विटरवर टीकेची झोड उठली होती. त्यावेळी ट्विटरने लेहचा उल्लेख चीनचा भाग म्हणून केला होता.
त्यावरून केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान सचिवांनी खरमरीत पत्र पाठवून ट्विटरची कानउघाडणी केली होती. दरम्यान, घोडचुकांचे सत्र चालूच ठेवल्यास ट्विटरवर माहिती-तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कारवाई केली जाऊ शकते. त्याशिवाय, सुधारित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. त्या पर्यायाचा अवलंब झाल्यास 6 महिने तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते.