नवी दिल्ली, दि. 29- देशात रेमडेसिविर इंजेक्शन्सचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. रेमडेसिविरचा तुटवडा दूर करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीची पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने इजिप्त, उज्बेकिस्तान, यूएई आणि बांग्लादेशकडून रेमडेसिविर खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून या देशांशी संपर्कही सुरू केला आहे.
अमेरिकेची फार्मा कंपनी गिलीएड सायन्सने भारताला 4.50 लाख इंजेक्शन देण्यास होकार दिला आहे. तसेच भारतात रेमडेसिविरचे उत्पादन वाढावे म्हणून कच्चा माल देण्याचाही निर्णय घेतला आहे. रेमडेसिविरचा तुटवडा पाहता केंद्राने रेमडेसिविरच्या निर्यातीवर बंदी घातली होती. केंद्राने रेमडेसिविरचे प्रती माह उत्पादन 78 लाख वायलपर्यंत वाढवण्याचे आधीच सांगितले होते. रेमडेसिविरच्या सात मॅन्यूफॅक्चर्सची सध्याची उत्पादन क्षमता 38.80 लाख वायल प्रति माह असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले होते.
उद्या शुक्रवारी अमेरिकेडून ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन कन्स्ट्रटेरसहीत इतर औषधांची पहिली खेप येण्याची शक्यता आहे. सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार अमेरिका एस्ट्राजेनेकाचे एक कोटी डोस भारताला देणार आहे. त्या शिवाय पाच कोटी डोसचे उत्पादन विविध टप्प्यात आहे. भारताने अमेरिकेकडे व्हॅक्सिनच्या तयार डोससह कोविड व्हॅक्सिनच्या उत्पादनासाठी कच्च्या मालाची मागणीही केली आहे.