पुणे – केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट कल्पनांचा अवलंब केल्याबद्दल देण्यात येणारे देशपातळीवरील ‘बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवॉर्ड’ घोषित केले. त्यात मतदार शिक्षण आणि सहभाग यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत वैशिष्यपूर्ण कामगिरीबद्दलचा पुरस्कार पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना जाहीर करण्यात आला आहे. येत्या बुधवारी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
जिल्ह्यामध्ये मतदार शिक्षण आणि मतदार शिक्षणासाठी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी अनेक नावीन्यपूर्ण कल्पना राबवल्या. युवकांचा मतदार नोंदणीतील सहभाग वाढविणे, महिलांची मतदार नोंदणी याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. वंचित घटकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवताना तृतीयपंथी मतदार, दिव्यांग मतदार, देह विक्री व्यवसायातील महिला यांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमध्ये आयोजित शिबिरांनाही युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यासह संयुक्त विद्यमाने शाळा व महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता संघांच्या बळकटीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.