समाजमाध्यमातून नागरिकांशी जोडले जाण्याचा प्रयत्न
अर्थमंत्रालयाची समाज माध्यमावर बुधवारपासून मोहीम
पुणे – केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे. मात्र, यामधील भाषा आणि संज्ञा अवजड असतात. त्यामुळे अर्थसंकल्प सर्वसामान्यांना गूढ वाटतो. सर्वसामान्य लोकांनाही अर्थसंकल्प काय असतो, त्यातील संज्ञांचा अर्थ काय असतो, त्याचा आपल्याशी काय संबंध असतो, याबद्दलची माहिती अर्थमंत्रालय बुधवारपासून (दि. 22 जाने.) समाज माध्यमावर सोप्या भाषेमध्ये जारी करणार आहे.
या मोहिमेचे नाव “अर्थशास्त्री’ असे ठेवण्यात आलेले आहे. या माध्यमातून प्रत्यक्ष कर काय असतात, अप्रत्यक्ष कर काय असतात, महसुलातील तूट काय असते, वित्तीय तूट काय असते, चालू खात्यावरील तूट काय असते, विविध क्षेत्रांना कशाप्रकारे अनुदान दिले जाते, प्राप्तिकर काय असतो. तो उत्पन्न किती असल्यास लागू शकतो आदी माहिती या मोहिमेतून दिली जाणार आहे.
सर्वसामान्य लोकांना ही माहिती समजावी याकरिता यामध्ये ऍनिमेटेड व्हिडीओ समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांबरोबरच अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांनाही ही माहिती उपयोगी पडणार आहे. गेल्या वर्षी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीही अर्थ मंत्रालयाने अर्थशास्त्र नावाची ही मोहीम राबविली होती आणि याला देश-विदेशातून प्रतिसाद मिळाला होता. आता यामध्ये आणखी बऱ्याच सुधारणा करून ही मोहीम बुधवारपासून सुरू करण्यात येणार आहे.
यामध्ये “अर्थ’ नावाचा एक चिकित्सक विद्यार्थी असतो तो प्रा. शास्त्री यांना अर्थसंकल्पाबाबत विविध प्रश्न विचारत असतो. प्राध्यापक शास्त्री “अर्थ’ नावाच्या विद्यार्थ्याला प्रश्नांची उत्तरे साध्या सोप्या भाषेमध्ये त्याचबरोबर दृकश्राव्य माध्यमातून देत असतात. सर्वसामान्यांच्या मनातील प्रश्न “अर्थ’ विचारीत असतो आणि प्राध्यापक शास्त्री त्याची उत्तरे देत असतात. समाजमाध्यमातून सर्वसामान्य लोकांनाही अर्थसंकल्पासाठी सूचना मागविल्या आहेत. तसे आवाहन पंतप्रधानांनीही केले होते. समाजमाध्यमातून सर्वसामान्य लोकांशी जोडले जाण्याचा हा प्रयत्न असल्याचे अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
मागील अर्थसंकल्पाचा लेखाजोखा
गेल्यावर्षी 1 फेब्रुवारी रोजी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात कोणत्या तरतुदी होत्या, त्यांची अंमलबजावणी किती प्रमाणात झाली, याचा लेखाजोखा एका दुसऱ्या मोहिमेच्या माध्यमातून देण्यात येणार असून या मोहिमेचे नाव “हमारा भरोसा’ असे आहे. ही माहिती भारतातील बारा भाषांमधून देण्यात येणार आहे. “अर्थशास्त्री’ आणि “हमारा भरोसा’ या दोन्ही मोहीम 29 जानेवारीपर्यंत चालणार आहेत. त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाणार आहे व 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.