केंद्र, राज्याने सुधारित अर्थसंकल्प सादर करावा – पृथ्वीराज चव्हाण

औरंगाबाद: करोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे. देशातील व्यवसाय आणि उद्योगांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने सुधारित अर्थसंकल्प सादर करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

औरंगाबादमधील पत्रकारांशी पृथ्वीराज चव्हाण यांनी आज ऑनलाईन संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, राज्यांकडे उत्पन्नाचे मर्यादित स्रोत आहेत. यातील सर्वात मोठा हिस्सा सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी वापरला जात आहे. राज्यांनी आपला खर्च संतुलित करण्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधले पाहिजेत. म्हणूनच केंद्र आणि राज्यांनी खर्चाचा सुधारित अंदाज सादर केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

लॉकडाऊनमुळे दोन महिन्यांपासून सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. कारखाने, उद्योगही बंद असल्याने रोजगार घटला असून बेरोजगारी वाढली आहे. ही परिस्थिती आणखी किती काळ सुरू राहील हे अद्यापही निश्‍चितपणे सांगता येणार नाही. यामुळे प्रत्येक राज्यांसमोर विविध संकटे उभी राहिली आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी आर्थिक नियोजनाची आश्‍यकता आहे, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजवर त्यांनी टीका केली. या पॅकेजमधील प्रत्यक्षात फक्‍त 2 लाख कोटी रुपये खर्च होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.