इंधनावर केंद्राने महाराष्ट्रातून वसूल केले अतिरिक्‍त 80 हजार कोटी; आमदार रोहित पवार यांनी मांडले गणित

मुंबई – केंद्र सरकारने उत्पादनशुल्क आणि अन्य वाढीतून इंधनावर जी कर आकारणी केली आहे, त्यातून एकट्या महाराष्ट्रातून केंद्र सरकारने गेल्या सहा वर्षांत तब्बल 80 हजार कोटी रुपये अतिरिक्‍तवसुली केली आहे, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. याचाच अर्थ महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाकडून गेल्या सहा वर्षांत केंद्र सरकारने जादाचे 27 हजार रुपये वसूल केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पवारांनी म्हटले आहे की, आजही सन 2014 च्या तुलनेत कच्चा तेलांचे आंतरराष्ट्रीय दर निम्म्याने कमी आहेत. सन 2014 मध्ये पेट्रोलवर प्रतिलिटर 9 रुपये 5 पैसे आणि डिझेलवर 3 रुपये 56 पैसे इतका कर आकारला जात होता.

आज केंद्र सरकारकडून पेट्रोलवर तब्बल 32 रुपये 90 पैसे प्रतिलिटर इतका कर आकारला जात असून, डिझेलवर केंद्र सरकारकडून प्रतिलिटर 31 रुपये 80 पैसे इतका कर आकारला जात आहे. सन 2014 च्या तुलनेत केंद्राच्या पेट्रोलवरील करात साडेतीनशे टक्के आणि डिझेलवरील करात तब्बल नऊशे टक्के वाढ करण्यात आली आहे.

वर्षभरात देशात पेट्रोलची 4 हजार कोटी लिटर आणि डिझेलची 9350 कोटी लिटर इतकी विक्री होते. सन 2014-15 साली केंद्र सरकारला पेट्रोलमधून 70 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळत होता. तो आता दरवर्षी तीन लाख कोटींच्यावर गेला आहे. इंधनावर अतिरिक्‍त कर आकारून केंद्र सरकारने सहा वर्षांत तब्बल आठ लाख कोटी रुपये जादा वसूल केले असून, त्यातील दहा टक्के रक्‍कम महाराष्ट्रातून वसूल झाली असे समजले तरी ही रक्कम 80 हजार कोटी रुपये इतकी होते, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.