Maharashtra Tur Procurement Approval : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत राज्यात ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदीला मूल्य समर्थन योजने अंतर्गत मंजुरी दिली. या खरेदीसाठी सुमारे २६९६ कोटी रुपये खर्च केले जाणार असून, यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे. या बैठकीत नेफेड, एनसीसीएफ आणि राज्य सरकारला खरेदी प्रक्रियेबाबत आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचे नमूद करत चौहान म्हणाले की, या खरेदीमुळे केंद्र सरकारवर मोठा आर्थिक भार पडणार असला, तरी शेतकऱ्यांचे हित जोपासणे ही आमची प्राथमिकता आहे. खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि दलालांची साखळी मोडीत काढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. शेतकऱ्यांची नोंदणी सुलभ व्हावी आणि त्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचे निर्देश त्यांनी दिले. विशेष म्हणजे, गरज भासल्यास खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या घराजवळच माल विकण्याची सुविधा मिळेल. नेफेड आणि एनसीसीएफ या संस्थांनी राज्य सरकारसोबत समन्वय साधून ही मोहीम राबवावी, जेणेकरून या योजनेचा थेट लाभ केवळ आणि केवळ खऱ्या शेतकऱ्यांनाच मिळेल, असेही चौहान यांनी यावेळी स्पष्ट केले.