संख्या 118 वर : दुष्काळाची झळही वाढली
पुणे – उन्हाची तीव्रता जसजशी वाढतेय, तशी टॅंकरची संख्याही वाढत आहे. जिल्ह्यात टॅंकरने शंभरीचा आकडा पार केला असून, तब्बल 118 टॅंकरच्या सहाय्याने 11 तालुक्यातील 70 गावे आणि 759 वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. त्यावरून जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता लक्षात येते. अजूनही दीड महिना उन्हाळा असल्यामुळे भविष्यात पाणी टंचाईची भिषणता काय असेल? या विचारानेच प्रशासन आणि नागरिकांची चिंता वाढू लागली आहे.
गतवर्षीपेक्षा यंदा एप्रिलमध्ये जिल्ह्यात 40 ने टॅंकरची संख्या वाढली आहे. यंदा परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे हा दुष्काळ वाट्याला आला असून, सर्वाधिक दुष्काळाची झळ बारामती आणि शिरूर तालुक्याला बसत आहे. आत्तापर्यंत भोर, वेल्हा, मुळशी आणि मावळ हे चार तालुके सोडून नऊ तालुक्यांमध्ये टॅंकर सुरू होते. परंतू, एप्रिलचा “कडक उन्हाळ्या’ला सुरवात झाली आणि भोर, वेल्हा तालुक्यातही टॅंकर सुरू करण्याची वेळ आली.
सद्यस्थितीत जिल्ह्यातील गाव आणि वाड्या वस्त्यांवरील तब्बल 2 लाख 18 हजार 600 व्यक्तींची तहान 118 टॅंकरच्या सहाय्याने भागविली जात आहे. त्यामध्ये सर्वाधिक बारामती तालुक्यात 31 टॅंकरद्वारे 20 गाव आणि 273 वाड्या वस्त्यांवरील 61 हजार 510 नागरिकांना पाणीपुरवठा सुरू आहे. तर शिरूर तालुक्यात 21 टॅंकरद्वारे 7 गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. पुरंदर तालुक्यात 15, आंबेगाव आणि दौंड येथे प्रत्येकी 11, जुन्नरमध्ये 9, खेडमध्ये 5, हवेली येथे 3, इंदापूर 10 तर भोर आणि वेल्हा तालुक्यात प्रत्येकी एक टॅंकर सुरू आहेत.