पिरंगुट -“जनता कर्फ्यू’ला मुळशी तालुक्यात उदंड प्रतिसाद मिळाला. तालुक्यात सर्व भागातील जनता यात सहभागी झाली होती. यामुळे मुळशी तालुक्यात निरव शांतता पसरली होती.
सर्वत्र दुकाने, वाहतूक व्यवस्था इतर छोटे-मोठे उद्योग व्यवसाय बंद होता. रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. मुळशी तालुक्याची औद्योगिक राजधानी अशी ओळख असलेल्या पिरंगुटमध्ये सर्व व्यवहार ठप्प होते. लवळेफाटा ते घोटावडेफाटा या भागातील सर्व व्यवहार ठप्प होते. परिसरातील दवाखाने व मेडिकल वगळता सर्वत्र “लॉक डाऊन ‘दिसून आला.नेहमी वर्दळ असलेला पिरंगुट चौक निर्मनुष्य होता.
मुळशी तालुक्याचा मुख्य चौक असलेल्या घोटावडेफाटा चौकात चिटपाखरू नव्हते. एरवी माणसे आणि वाहने यांच्या गर्दीने फुललेल्या या चौकाने आज मोकळा श्वास घेतला होता. तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या पौडमध्ये सर्वत्र शांतता पसरली होती. तहसील कार्यालय परिसर, पौड बस स्थानक परिसर, बाजारपेठ येथे सगळी दुकाने व कार्यालये बंद होती.
सरकारी बस व एसटी वगळता एकही वाहन रस्त्यावर नव्हते. भूगाव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने सकाळी सायरन वाजवून याला प्रतिसाद मिळाला. ग्रामपंचायतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व व्यवहार ठप्प होते. दरम्यानच्या काळात पौड पोलीस ठाण्याच्या वतीने सर्वत्र पोलीस कर्मचारी गस्त घालत होते. रस्त्यावर दिसणाऱ्या नागरिकांना व वाहन चालकांना घरात बसण्याचे आवाहन पोलीस अधिकारी व कर्मचारी करत होते.