गोदामांसह बाजारपेठेत मालच नाही; कंपन्यांकडून उत्पादन कमीचा परिणाम
फुरसुंगी – पुणे शहर तसेच उपनगरांतील प्रतिबंधीत क्षेत्र वगळता लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने ग्रीन तसेच ऑरेंज झोनमध्ये काही ठिकाणी बांधकामे सुरू झाली आहेत. परंतु, बांधकाम साहित्यातील काही गोष्टींचा तुटवडा तसेच सिमेंटच्या दरांतही मोठी वाढ झाल्याने काम सुरू; पण, व्यावसाय बंद, अशी अवस्था झाली आहे.
लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्यात बांधकामांना काही अटींवर परवानगी देण्यात आली आहे. काही ठिकाणी बांधकाम सुरू असल्याने किरकोळ संख्येत मजूर कामगार येत असल्याने कामाची रेलचेल सुरू आहे. परंतु, बाजारपेठेत सिमेंटची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. फुरसुंगी येथे रेल्वे मालगाड्यांतून सिमेंट येते.
परंतु, मे महिन्यांच्या पहिल्या आठवड्यापासून नेहमीपेक्षा 50 टक्केही सिमेंटच्या वॅगन आलेल्या नाहीत. यामुळे येथील सिमेंटची गोदामे निम्मी, अर्धी रिकामीच आहेत. लॉकडाऊनमुळे मागणी अभावी डिलर्सनी माल मागविला नसल्याने पुणे शहरातून सिमेंटची मागणी कमी होती. परंतु, बांधकामांना परवानगी मिळाल्याने अचानक मागणी वाढू लागल्याने किरकोळ बाजारात सिमेंटचे भाव वाढले असल्याचे एजन्सीकडून सांगण्यात आले. मार्च महिन्यात 50 किलोच्या गोणीची किंमत 280 ते 300 रुपयांपर्यंत होती आता हाच दर 410 ते 430 रुपयांपर्यंत गेला आहे. विशेष म्हणजे अंतिम टप्प्यातील कामे पूर्ण करण्यासाठी सिमेंटसाठी जादा दर देण्याचीही तयारी असताना बाजारात मालच नसल्याने व्यावसायिकांची अडचण झाली आहे.
लॉकडाऊनच्या काळात मजुर नसल्याने उत्पादन कमी केल्याने कंपन्यांकडून मालाचा पुरवठा होत नसल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु, अनेक सिमेंट कंपन्या अत्याधुनिक असल्याने उत्पादन वाढविता येऊ शकते. परंतु, अशा कालावधीत नफेखोरी करण्याकरिताच उत्पादन वाढविले जात नसल्याचे उघड आहे. विशेष म्हणजे, याकडे संबंधीत यंत्रणेचेही दुर्लक्ष आहे.
उत्पादन कमी असल्याने बाजारपेठेत माल कमी येत आहे. कंपन्यांमध्ये तसेच रेल्वे धक्क्यांवर गाड्या भरण्यासाठी मजुरांची टंचाई असल्याचे कारणही कंपन्या आणि डिलर्सकडून दिले जात आहे. यातून बाजारात सिमेंट येण्यात अडचणी येत आहेत.
– राजेंद्र चौधरी, सिमेंट विक्रेते