सेलिब्रेटींचे ‘ते’ ट्विट भाजप पुरस्कृत; देवेंद्र फडणवीसांची अप्रत्यक्ष कबुली

मुंबई : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे मागील तीन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. शेतकरी आंदोलनावर इंटरनॅशनल पॉपस्टार रिहानाने ट्विट केल्यानंतर देशभरात ट्विटर युद्ध पाहायला मिळालं होतं. रिहानाच्या ट्विटनंतर खेळाडू, बॉलिवूड सेलिब्रेटींनी ट्विट करत, भारताला विभागण्याचा प्रयत्न होत असून, तसे होऊ देऊ नका असं आवाहन केले होतं. मात्र सेलिब्रेटींचे ट्विट हे भाजपच्या इशाऱ्यावर झाले होते, असा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आधी विरोध केल्यानंतर आता अप्रत्यक्ष कबुली दिली आहे.

सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर आणि इतर सेलिब्रिटींच्या ट्वीटची चौकशी करण्याच्या प्रकरणावरून विधानसभेत विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला. यावेळी फडणवीस म्हणाले की, देशासाठी आम्ही जर सेलिब्रेटींना ट्विट करायला सांगितलं तर आम्हाला अभिमान आहे. यातून आमची देशभक्ती दिसतीये, असंही फडणवीस यांनी म्हटलं. फडणवीसांनी असं बोलून ते ट्विट भाजप पुरस्कृतच होते, अशी अप्रत्यक्ष कबुली दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रेटींच्या चौकशीचे आदेश दिले होते. यावरून फडणवीस सुरुवातीला संतापले होते.  भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे. खरे तर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे, असंही फडणवीस यांनी म्हटलं होतं. आता मात्र फडणवीस यांनी सेलिब्रेटींना ट्विट करण्यास भाग पाडल्याच्या कृतीचं समर्थन केलं आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.