नवी दिल्ली – करोनाचा कहर देशभर सुरू आहे. दररोज करोनाबाधितांची आणि मृत्यूच्या नवीन घटनांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे रुग्णालयांची स्थितीही सुधारलेली नाही परंतु यावर मात करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. करोनाने आतापर्यंत लाखो लोकांना संक्रमित केले. बॉलिवूडभोवतीही करोनाने आपला विळखा घट्ट केला आहे. यामध्ये चित्रपट, संगीत क्षेत्रातील काही सेलिब्रिटींनाही आपला जीव गमवावा लागला. चला तर, आपण त्या दुर्दैवी स्टार्सबाबत जाणून घेऊया, ज्यांना करोनाविरूद्ध लढाई जिंकता आली नाही.
*पंडित राजन मिश्रा
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे ज्येष्ठ पंडित राजन मिश्रा यांचे 25 एप्रिल रोजी करोनामुळे निधन झाले. बनारस घराण्याचे गायक 70 वर्षीय राजन मिश्रा यांना सेंट स्टीफन हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. त्यांना करोना विषाणूची लागण झाल्यानंतर मूत्रपिंडाचा त्रास झाला. राजन मिश्रा यांना वेळेवर व्हेंटिलेटर बेड मिळू शकला नाही, ज्यामुळे त्यांचा जीव वाचवला जाऊ शकला नाही.
* श्रावण राठोड
‘आशिकी’ सारख्या ९० च्या दशकातील बॉलिवूडच्या असंख्य चित्रपटांना सुमधुर आणि संस्मरणीय संगीत देणारे सुप्रसिद्ध संगीतकार नदीम-श्रवण जोडीतील श्रवण राठोड यांचे 22 एप्रिल रोजी निधन झाले. दोन दिवसांपूर्वी त्यांना करोना संसर्ग झाल्याची बातमी आली होती. नदीम श्रवण जोडीने हिंदी चित्रपटांमध्ये सुपरहिट संगीत दिले आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘आशिकी’, ‘दिल है के मानता नहीं’, ‘साजन’, ‘परदेस’, ‘सडक’, ‘दिल का क्या कसूर’ आणि ‘धडकन’ अशा एकाहून एक सरस चित्रपटांचे संगीत आजही तितक्याच आवडीने ऐकले जाते.
* ललित बहल
ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माता ललित बहल यांचे 23 एप्रिल रोजी करोना संसर्गामुळे निधन झाले. बहलने ‘तितली’ आणि ‘मुक्ति भवन’ सारख्या चित्रपटात काम केले आहे. गेल्या आठवड्यात या 71 वर्षीय अभिनेत्याला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
* शाम देहाती
भोजपुरी चित्रपटांचे प्रसिद्ध गीतकार, संगीतकार आणि अभिनेता श्याम देहाती यांचे 20 एप्रिल रोजी निधन झाले. त्यांना करोना संसर्ग झाल्याने गोरखपूर येथे उपचार सुरू होते. डझनभर चित्रपटात गाणी लिहिल्यानंतर त्यांनी चित्रपटांमध्ये संगीत देण्याचे कामही केले. आणि तीन वर्षांपूर्वी ते ‘राणी दिलबर जान’ या चित्रपटाचे नायकही बनला होता.
* किशोर नांदलस्कर
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे 20 एप्रिल रोजी करोना संसर्गामुळे निधन झाले. करोना इन्फेक्शन झाल्याचे निदान झाल्याने किशोर यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच त्यांचा मृत्यू झाला. किशोर नांदलस्कर यांनी आपल्या कारकीर्दीत सुमारे 40 नाटकं, 30 चित्रपट आणि 20 मालिकांमध्ये काम केले.
* जॉनी लाल
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध छायाचित्रकार जॉनी लाल यांचे या महिन्यात निधन झाले. जॉनी लाल हेदेखील करोनाला बळी पडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर घरगुती उपचार सुरू होते. जॉनी लाल यांनी आर. माधवन स्टारर फिल्म ‘रेहना है तेरे दिल में’ आणि तुषार कपूर स्टारर फिल्म ‘मुझे कुछ कहना है’ सारख्या चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफी केली.
* वीरा साथीदार
नॅशनल फिल्म अवॉर्ड विजेत्या ‘कोर्ट’ या चित्रपटामुळे चर्चेत आलेले अभिनेते वीरा साथीदार यांचे करोना संसर्गावर उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्यावर नागपुरातील रुग्णालयात उपचार सुरू होते. श्वासाच्या त्रासामुळे त्यांना नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अभिनयाव्यतिरिक्त, लेखन आणि गाण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या वीरा साथीदार यांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारप्राप्त फिल्म ‘कोर्ट’ मध्ये खूप महत्वाची भूमिका बजावली.
* सतीश कौल
अमिताभ बच्चन-दिलीप कुमार यांच्यासोबत काम करणारे प्रसिद्ध अभिनेते सतीश कौल यांचे 10 एप्रिल रोजी निधन झाले. सतीश हे एकेकाळी हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमधील एक सुप्रसिद्ध नाव होते. 1974 ते 1998 या काळात सतीशने 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. गेल्या वर्षी त्यांनी सोशल मीडियावर आर्थिक मदत मागितली होती. करोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे त्यांची स्थिती आणखी बिकट झाली. सतीश यांच्याकडील सर्व पैसे एका व्यवसायात बुडले होते.