वॉशिंग्टन – अयोध्येत श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनानिमित्त अमेरिकेत असलेल्या भारतीयांनीही आनंदोत्सव साजरा केला. यानिमित्त भारतीयांनी दिव्यांची रोषणाई केली आणि ट्रकवर श्रीराम आणि नियोजित राममंदिराच्या डिजीटल चित्रे सजवली गेली होती. हे चित्ररथ वॉशिंग्टन शहरातून मोठ्या दिमाखात फिरवण्यात आले.
अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिराचे भूमिपूजन झाले. या राममंदिराच्या निर्माणासाठी भारतीय जनता पक्षाकडून तीन दशके आंदोलन आणि संघर्ष केला गेलेला होता. या संघर्षाचे साक्षीदारा असलेल्या शेकडो भारतीयांनी या ऐतिहासिक क्षणाचा उत्सव अमेरिकेत मोठ्या उत्साहाने साजरा केला. करोनाच्या साथीमुळे सार्वजनिक उत्सव मर्यादित होते, तर देशातील विविध भागात अनेक आभासी कार्यक्रम सुरुच होते.
अमेरिकेत, विविध हिंदू संघटनांनी या कार्यक्रमाचे महत्त्व दर्शविण्यासाठी आभासी कार्यक्रम आयोजित केले होते. वॉशिंग्टन शहरामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी चित्ररथांद्वारे शोभायात्रेचे आयोजन केले होते. त्यावेळी “जय श्रीराम’च्या घोषणांनी वातावरण दुमदुमले होते. अमेरिकेतील अन्य प्रमुख शहरांमध्ये हिंदू समुदायांनी दिव्यांची रोषणाई केली होती.
“अयोध्येत राम मंदिर उभारणीचा पायाभरणीच्या या ऐतिहासिक दिवशी सर्व भारतीय, विशेषत: हिंदू, जैन आणि भगवान राम यांची उपासना करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन.’ अशा शब्दात कॅलिफोर्नियास्थित हिंदू नेते अजय जैन भुतोरिया यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध टाईम स्क्वेअरमध्ये एक मोठ्या कार्यक्रमात भगवान राम आणि प्रस्तावित मंदिरांच्या प्रतिमा अवाढव्य पडद्यावर प्रदर्शित करण्यात आल्या. अमेरिकेत ठिकठिकाणी असलेल्या हिंदू मंदिरांमध्ये आजच्या दिवशी विशेष धार्मिक समारंभांचे आयोजन करण्यात अले होते.
नागरिकांनी वैयक्तिक पातळीवर पूजा, प्रसाद वाटप आणि रोषणाई करून या प्रसंगाचे औचित्य साजरे केले. विविध कार्यक्रमांद्वारे होणारा आनंदोत्सव टिव्हीवरील वाहिन्यांवरून प्रसारित करण्यात येत आहे. या राममंदिराच्या भूमिपूजनापर्यंतच्या महत्वाच्या टप्प्यामध्ये आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांची भूमिका खूप मोठी असल्याचे अमेरिकेत स्थायिक हिंदूंची भावना आहे.