सातारा – खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते मानाच्या भवानी तलवारीचे पारंपरिक पद्धतीने जलमंदिरमध्ये पूजन करण्यात आले. माजी नगराध्यक्ष शिवाजीराजे भोसले यांच्या निधनामुळे यंदा राजघराण्याने यंदाचा दसरा अत्यंत साधेपणाने साजरा केला. सातारा शहरात मात्र दसऱ्याचा जंगी जल्लोष पाहायला मिळायला. सातारकरांनी एकमेकांना सोने देत सीमोल्लंघन केले.
साताऱ्यात दरवर्षी जलमंदिर ते पोवई नाका यादरम्यान दसऱ्याची शाही मिरवणूक काढली जाते. मात्र, शिवाजीराजे भोसले यांचे निधन झाल्याने यावेळी शाही मिरवणूक रद्द करण्यात येऊन यंदाचा दसरा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.
विजयादशमीच्या मुहूर्तावर सायंकाळी साडेपाच वाजता उदयनराजे यांच्या हस्ते मानाच्या पारंपरिक भवानी तलवारीचे विधिवत पूजन करण्यात आले. पौरिहत्य उपेंद्र धांदरफळे यांनी केले. त्यानंतर उदयनराजेंनी निवडक सहकाऱ्यांना सोने देत मोजक्या सहकाऱ्यांशी संवाद साधला, साताऱ्यात मात्र दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळाला. वाहन बाजारात आणि सराफ बाजारामध्ये लाखो रुपयांची उलाढाल झाली. अनेक गृहप्रकल्प शानदार पद्धतीने लॉन्च झाले. त्यामुळे यंदा व्यावसायिक बाजारपेठेत मोठी उलाढाल झाल्याने व्यापारी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. मोती चौक ते खण आळी, मोती चौक ते पोवई नाका यादरम्यान खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती.
त्याचबरोबर दशमीच्या मुहूर्तावर आदिशक्तीच्या जागराचा शेवटचा दिवस असल्याने पारंपारिक पद्धतीने देवींना निरोप देण्यात आला. त्याकरिता सातारा पालिकेने बुधवार नाका येथे कृत्रिम विसर्जन तळे सज्ज ठेवले होते. मोती चौक ते बुधवार नाका यादरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली होती. विसर्जन मिरवणुका टप्प्याटप्प्याने वाहतुकीची अडथळा होणार नाही अशा पद्धतीने बुधवार नाक्याकडे रवाना करण्यात आल्या. रात्री उशिरापर्यंत देवी विसर्जनाच्या मिरवणुका सुरू होत्या यंदाचा दसरा जोरदार केल्याने दिवाळी सुद्धा दणकेबाज होणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे व्यापारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.