राष्ट्रीय ध्रुवीय व सागरी संशोधन केंद्राचा 19वा स्थापना दिन साजरा

अंतराळवीर राकेश शर्मा उपस्थित

वास्को  – भारत सरकारच्या, पृथ्वी विज्ञान मंत्रालायचा भाग असलेल्या राष्ट्रीय ध्रुवीय व सागरी संशोधन केंद्राने (एनसीपीओआर) शुक्रवारी अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या उपस्थितीत आपला 19वा स्थापना दिवस साजरा केला.
विंग कमांडर राकेश शर्मा (निवृत्त) यांच्यासह गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.वरुण साहनी, “एनआयओ’चे डॉ.अभय मुधोलकर, गोवा विज्ञान व नभांगण केंद्राचे वेंकट दुर्गा प्रसाद व “एनसीपीओआर’चे शास्त्रज्ञ यांच्या उपस्थितीत या समारंभाचे उद्‌घाटन करण्यात आले.

“एनसीपीओआर’चे संचालक डॉ. एम. रविचंद्रन यांनी याप्रसंगी स्वागतपर भाषणात एनसीपीओआरच्या वैज्ञानिकांचे योगदान व यश तसेच अंटार्टिका, आर्टिक, दक्षिणी महासागर व हिमालयामधील विविध वैज्ञानिक प्रकल्पांचा इतिहास व विकास अधोरेखित केला.

या निमित्ताने विंग कमांडर राकेश शर्मा यांनी भविष्यातील अवकाश संशोधन या विषयावर आपले विचार मांडले. त्यांनी चंद्र, मंगळ या ग्रहांची स्थिती, अवकाश संशोधनाची वर्तमान स्थिती व अवकाश संशोधनातील भारताची भूमिका यावर भर दिला. मानवाच्या अस्तित्वाकरिता चंद्र व मंगळावरील संशोधन महत्वपूर्ण असल्याचे नमूद करताना सध्या आपल्या अस्तित्वाचे ठिकाण असलेल्या पृथ्वी ग्रहाची काळजी आपण घ्यायला हवी, पुढच्या पिढीला उत्तम, सुरक्षित धरा द्यायची असेल तर आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल, याची देखील जाणीव शर्मा यांनी करून दिली. पृथ्वीवरील वैकल्पिक उर्जा स्रोतांचा वापर तसेच अवकाश संशोधनातील आर्थिक गुंतवणुकीची आवश्‍यकता लक्षात आणून दिली. अर्थीं गुंतवणूक अधिक प्रमाणात लागत असल्याने आता खासगी क्षेत्राला देखील यामध्ये समाविष्ट करून घ्यावे लागत आहे. यामुळे अवकाश पर्यटनासारख्या कल्पना पुढे येत आहेत आणि पर्यटन म्हटल्यावर प्रदूषणासारख्या समस्येला तोंड द्यावे लागू शकते, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. अवकाश संशोधन हे राष्ट्रांमधील स्पर्धा न बनता तो सहकारी तत्वावरील प्रयत्न असावा; तसेच त्याचा उद्देश लोकांना एकत्रित करणे असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आपल्या व्याख्यानाच्या शेवटी भारताची भूमिका समजावून सांगताना ते म्हणाले की, भारताचे अवकाश संशोधन कार्य हे सामान्य नागरिकाच्या सामाजिक-आर्थिक लाभासाठी आहे; बाकी देशांच्या तुलनेत भारताचा संशोधन कार्यक्रम स्वस्त व रास्त असा आहे. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेऊन बनविलेल्या या संशोधन कार्यात भारतीय उपखंडाचे भारत नेतृत्व करत आहे.

यावेळी एनसीपीओआर मधील सर्वोत्तम प्रबंध पुरस्कार एनसीपीओआरचे शास्त्रज्ञ सौरव चटर्जी यांना देण्यात आला. तसेच, एनसीपीओआरचे शास्त्रज्ञ डॉ. अविनाश कुमार यांना नवीन एनसीपीओआर बोधचिन्हासाठी सन्मानित करण्यात आले. विंग कमांडर राकेश शर्मा, डॉ. एम. रविचंद्रन आणि डॉ. राहुल मोहन यांच्या हस्ते भूगोल व आपण या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. याशिवाय, ऑगस्ट मध्ये होणाऱ्या परिषदेच्या संकेतस्थळाचे लोकार्पण देखील यावेळी करण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.